Pune News : शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अमित शहा यांना निवेदन

एमपीसी न्यूज – शनिवारवाड्याचे पुनरुज्जीवन करून गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एका पत्राद्वारे बुधवारी केली.

पुण्यातील थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदन साठे, विश्वस्त श्रीकांत नगरकर यांनी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्यासह प्रदेशाध्यक्ष पाटील यांची भेट घेतली. शनिवारवाड्याला गतवैभव प्राप्त करून देण्याची त्यांनी विनंती केली. तिची दखल घेत पाटील यांनी गृहमंत्री शहा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘शनिवारवाडा बाजीराव पेशवे यांनी 1731 मध्ये बांधून पूर्ण केला. या वाड्यातून पेशव्यांनी सुमारे 85 वर्षे देशातील बहुतांश भागावर नियंत्रण प्रस्थापित करून राज्य कारभार केला. या वाड्याचे महत्त्व कमी करण्यासाठी इंग्रजांनी 1818 नंतर येथे भाजी मंडई केली. तसेच मनोरुगण कैद्यांना ठेवण्यासाठी त्याचा वापर केला. 1828 मध्ये या वाड्याला आग लावण्यात आली. ती सात दिवस धुमसत होती. त्यात शनिवारवाड्याचा बहुतांश भाग उद्ध्वस्त झाला.

हजारी कारंजाचे काही अवशेष आजही दिसतात. नगारखाना, 300 वर्षांपूर्वीचा दरवाजा, मराठी चित्रशैली आदी शनिवारवाड्याची ओळख आता पुसट होऊ लागली आहे. त्यामुळे त्याकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज आहे. पहिले श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शनिवारवाडा हे निवासस्थान होते. त्यामुळे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या शनिवारवाड्याच्या पुनुरूज्जीवनासाठी सर्वतोपरी प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी आपण पुढाकार घेऊन कार्यवाही करावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.