Pune News : देशप्रेम जागविण्याचे शाहिरांचे कार्य प्रेरणादायी; प्रसिद्ध तबलावादक अरविंदकुमार आझाद यांची भावना

एमपीसी न्यूज –  शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीसारख्या अनेक संस्थांनी शाहिरी परंपरा जिवंत ठेवण्यात योगदान दिले आहे. त्यामाध्यमातून शाहिरांनी देशप्रेम जागविण्याचे प्रेरणादायी कार्य केले आहे, अशी भावना बनारस घराण्यातील ज्येष्ठ तबलावादक व गुरु अरविंदकुमार आझाद यांनी व्यक्त केली.

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कै.शाहीरसम्राट किसनराव हिंगे यांच्या स्मृतीदिनानिमित्त हिंगे यांचे सहकारी गुरुप्रसाद नानिवडेकर यांचा विशेष सन्मान इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन (आयसीसीआर) पुणे विभागाच्या निशी बाला यांच्या हस्ते टिंबर मार्केटमधील सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमात करण्यात आला. आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ‘शाहिरी निनाद’ या वार्षिकांकाचे प्रकाशन करण्यात आले. अरुणकुमार बाभुळगांवकर, ढोलकीवादक राजकुमार गायकवाड, शाहीर देवराज कांबळे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  

 

निशी बाला म्हणाल्या, पोवाड्याची परंपरा महाराष्ट्राला कायमच प्रेरणा देत आली आहे. ही परंपरा हिंगे प्रबोधिनीच्या माध्यमातून सुरू आहे, त्याचा आपल्याला अभिमान वाटतो. ही वाटचाल अखंडित सुरू राहावी.

हेमंतराजे मावळे म्हणाले, शास्त्रीय संगीत हे प्रमाणबद्ध असते. शाहिरी ही श्रोत्यांच्या अंगावर रोमांच उभे करते. शाहिरीच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रासाठी योगदान देत आहोत. त्यासाठी शाहिरीची पंरपरा आम्ही प्राणपणाने जपली आहे. कोरोनाच्या काळात लोककलावंतांचे खूपच हाल झाले. अशावेळी राष्ट्रीय सांस्कृतिक परिषदेने कलावंताना मदतीचा हात पुढे केला. त्याची अनेकांना मदत झाली. लवकरच शाहीर हिंगे प्रबोधिनीतर्फे गरीब व विशेष मुलांसाठी वेगवेगळ्या गडांवर २५ सहलींचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मावळे यांनी यावेळी जाहीर केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.