Pune Municipal Election : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काकडे गटाचे वजन वाढले 

महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, सभागृह नेते पद मिळविण्यासाठी फिल्डिंग

एमपीसी न्यूज – 2022 च्या पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपमध्ये राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे गटाचे वजन कमालीचे वाढले आहे. भाजपने नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा धडाकाच लावला आहे. मागील 4 वर्षे काकडे गटाला कोणतेही मनाचे पद नव्हते. शेवटच्या वर्षात मात्र त्यांना महत्त्वाची पदे दिली जात आहेत.

Pmpml संचालक, शहर सुधारणा समिती अध्यक्ष, पक्ष संघटनेत महत्त्वाची पदे देण्यात येत आहेत. पुणे महापालिकेतील भाजपची  एकहाती सत्ता टिकविण्यासाठी काकडे गटाला टिकवून ठेवणे गरजेचे आहे. याची जाणीव वरिष्ठ नेत्यांना झाली आहे.

त्यामुळेच आगामी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते पद बदलताना काकडे गटाला मोठी संधी मिळू शकते, अशी खमंग चर्चा सुरू आहे. आगामी महापालिकेची निवडणूक ही वॉर्ड पद्धतीने होणार आहे. त्यामुळे काँग्रेस – राष्ट्रवादी आणि शिवसेना ही महाविकास आघाडी एकत्रच लढणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

या आघाडीचा सामना करण्यासाठी काकडे गट अत्यंत महत्वाचा आहे. त्याला टिकवून ठेवण्यासाठी भाजपने आगामी काळात त्यांना आणखी मनाचे पद दिले तर आश्चर्य वाटायला नको. काकडे गट मात्र यावेळी महापौर किंवा स्थायी समिती अध्यक्षपद मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे.

भाजपमध्ये सध्या पद वाटप करण्याची जोरदार स्पर्धा लागली आहे. कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. 2017 मध्ये 4 चा प्रभाग असल्याने भाजपाला फायदा झाला. वॉर्ड पद्धतीत महाविकास आघाडीचा जास्त बोलबाला असल्याने भाजपला आणखी जोर लावावा लागणार, हे वास्तव आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.