Pune News : पुणे-मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात, चौघे जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळच्या सुमारास ट्रक आणि कार मध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास प्रचंड धुके पडले होते. त्यामुळे काही अंतरावरील वाहने दिसत नव्हती. त्यात ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाशही कमी होता. मुंबईच्या दिशेने आज सकाळच्या सुमारास एक ट्रक चालला असताना भरधाव वेगात आलेल्या कारला धुक्यामुळे हा ट्रक दिसला नाही आणि ही कार त्या ट्रकला पाठीमागून जाऊन धडकली. ही धडक इतकी भयानक होती की कार संपूर्ण ट्रकच्या आतमध्ये जाऊन घुसली.

या अपघातात कारमधील चार जण जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती परंतु त्यानंतर देवदूत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केली आणि त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.