Pune News : वालचंदनगर पोलिसांनी पकडला धारदार शस्त्रसाठा, एकास अटक

एमपीसी न्यूज – वालचंदनगर पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराला पकडून त्याची चौकशी केली, त्याच्याकडून दहा घातक शस्त्रे ताब्यात घेतली आहेत. पोलिसांची ही मोठी कामगिरी मानली जात आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक दिलीप पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली.

सचिन गंधारे (रा. शेळगाव ता. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सचिन गंधारे याच्यावर यापूर्वीदेखील काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वालचंदनगर पोलीस ठाण्यात घातक शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर बारामती रस्त्यावर एक संशयित दुचाकीस्वार वालचंदनगर रस्त्यावर काहीतरी पार्सल घेऊन येत असल्याचे दिसले. त्यावरून त्यास थांबवून चौकशी केली असता व त्याच्या दुचाकीवरील साहित्याची तपासणी केली असता, त्यामध्ये 10 धारदार शस्त्रे आढळून आली.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार, फौजदार अतुल खंदारे, पोलीस हवालदार माने, वायसे, चितकोटे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.