Pune News : सर्वसामान्यांना आर्थिक मदतीचं काय ? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सवाल

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्य सरकार विकेंड लॉकडाऊनसह काही निर्बंध लागू करत आहे. मात्र, यामुळे सर्वसामान्यांचे जे आर्थिक नुकसान होईल, त्याला कोण जबाबदार ? त्यांना राज्य सरकार आर्थिक मदत का जाहीर करत नाही, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

राज्य सरकारच्या लॉकडाऊन संदर्भातील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने विकेंड लॉकडाऊनसह रात्री 8 नंतर संचारबंदी लागू करण्यासह काही निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. मात्र, या निर्णयामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. जे रोज संध्याकाळी खाऊची गाडी लावून आपला उदरनिर्वाह चालवतात, त्यांचे आर्थिक नुकसान होईल. त्या नुकसानीसाठी राज्य सरकार मदतीची भूमिका का घेत नाही ?

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारच्या निर्णयाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य द्यावे, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतली. मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांचा निर्णय मान्यच करावा लागेल. मात्र, त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सूचना केल्या, त्या मान्य करुन मुख्यमंत्री राज्य सरकारने दिलेल्या वीजतोडणीच्या आदेशाला स्थगिती का देत नाहीत ? तसेच राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे फेरीवाले, घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षावाले आदी घटकांचे जे नुकसान होणार आहे, त्यासाठी आर्थिक मदत का जाहीर करत नाही ?

ते पुढे म्हणाले की, कोरोनापासून जनतेचं रक्षण करण्याला सरकारची प्राथमिकता आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. मात्र, कोरोनापासून जनतेचं रक्षण करता करता, रोजगार बुडाल्याने भूकबळीने मृत्यू झाला, तर त्याला कोण जबाबदार ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.