Pune News: तरुण IAS अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – त्रिपुरा केडरच्या 2015 च्या बॅचचे आयएएस अधिकारी सुधाकर शिंदे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्यामुळे त्यांना आज सायंकाळच्या सुमारास रुग्णवाहिकेतून पुण्याच्या रूबी हॉल क्लिनिकमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले. परंतु रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सुरुवातीला त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  परंतु तेथेही त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने त्यांना औरंगाबादहून आज सायंकाळच्या सुमारास रूबी हॉल क्लिनिक मध्ये हलविण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सुधाकर शिंदे हे त्रिपुरा राज्यातील वित्त विभागाचे सहसचिव तसेच कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य अधिकारी होते. गावी येण्यासाठी शिंदे यांनी 18 सप्टेंबरपासून रजा टाकली होती. गावात आल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.