Chinchwad News: डीसीपी स्मिता पाटील, एसीपी श्रीधर जाधव यांची बदली; शहरात नवीन तीन एसीपींची नियुक्ती

एसीपी प्रेरणा कट्टे, गणेश बिरादार. डॉ. सागर कवडे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपायुक्त (डीसीपी) स्मिता पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) श्रीधर जाधव यांची बदली करण्यात आली आहे. तर नवीन तीन एसीपींची शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने शुक्रवारी (दि. 9) दिले आहेत.

खंडाळा पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यपदावरून स्मिता पाटील यांची पिंपरी-चिंचवड शहरात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. वर्षभराहून अधिक कालावधी झाल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या नवीन नियुक्तीचे ठिकाण दिले नसून त्याबाबतचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे गृह विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

तसेच पिंपरी चिंचवड शहरातील वाकड विभागाचे एसीपी श्रीधर जाधव यांची नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

एसीपी प्रेरणा कट्टे आणि गणेश बिरादार यांची नागपूर शहरातून मागील काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यांना नवीन बदलीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. त्यांची 9 ऑक्टोबरच्या आदेशानुसार पिंपरी- चिंचवड शहरात बदली करण्यात आली आहे.

तसेच राज्य पोलीस सेवेतील प्रतिक्षाधीन असलेले डॉ. सागर कवडे यांची देखील पिंपरी- चिंचवड शहरात नियुक्ती करण्यात आली आहे.

चाकण विभागाचे एसीपी रामचंद्र जाधव पूर्वपदावर

दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी गृह विभागाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात चाकण विभागाचे एसीपी रामचंद्र जाधव यांची पोलीस प्रशिक्षण विद्यालय, जालना येथे पोलीस उपअधीक्षकपदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. मॅटच्या निर्णयानंतर त्यांनी पुन्हा चाकण विभागाचे एसीपी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.