Pune: पंतप्रधान मोदींनी फोनवर केली नायडू रुग्णालयातील ‘सिस्टर’ची आपुलकीनं विचारपूस, दिले कोरोना विरुद्ध लढण्यासाठी नवे बळ!

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयातील परिचारिका सिस्टर छाया यांचा फोन खणखणला. त्यावेळी त्यांचा विश्वासच बसला नाही. तो फोन होता थेट पंतप्रधान कार्यालयातून! त्यानंतर स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिस्टर छाया यांच्याशी संवाद साधला. त्यांची व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची आपुलकीने विचारपूस केली. कोरोनाबाधित रुग्णांची सेवा हे पंतप्रधानापेक्षाही  फार मोठे काम असल्याचे सांगत मोदी यांनी कौतुकाची थाप दिली आणि रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी यांना कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी नवे बळ मिळाले. 

डॉ. नायडू रुग्णालयातील कोरोना रुग्णांवरील उपचाराचे कामकाज कसे चालले आहे, हे जाणून घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वतःहून सिस्टर छाया यांच्याशी संपर्क साधला. सिस्टर छाया यांचे नाव घेऊन आपण कशा आहात, स्वतःची काळजी घेताय ना, असे मराठीत विचारून त्यांची आपुलकीने चौकशी केली. त्यानंतर रुग्णालयातील कामकाजाची माहिती घेतली. सात रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सिस्टर छाया यांनी सांगताच मोदी यांनी आनंद व्यक्त केला. रुग्णालयातील सर्व स्टाफचे कौतुकही केले.

पंतप्रधानांनी स्वतः फोन करून संवाद साधल्याने सिस्टर छाया भारावून गेल्या होत्या. पंतप्रधान म्हणून  देशावरील कोरोनाचे संकंट दूर करण्याचे फार मोठे काम मोदी करीत आहेत व असा पंतप्रधान मिळणे, हे देशाचे भाग्य आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावर ‘मी तर काहीच काम करत नाही. खरे काम तर तुम्ही सर्वजण करत आहात. आपली विचारपूस करणे हे तर माझे कर्तव्यच आहे, या शब्दांत मोदींनी सर्वांचे कौतुक केले.

देशातील इतर परिचारिकांना काय सांगाल, असे मोदींनी विचारले असता, कोरोना विरुद्ध युद्ध जिंकण्याचा निर्धार सिस्टर छाया यांनी व्यक्त केला.

सुमारे चार मिनिटांच्या या फोनचे रेकॉर्डिंग पुणे महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. पंतप्रधानांचे हे प्रेरणादायी संभाषण नक्की ऐका….

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.