Pune : पोलिसांमधील संवेदनशीलतेमुळे वाचले निराधार वृद्धाचे प्राण

एमपीसी न्यूज- पोलिसांमधील असंवेदनशीलतेचे अनेक किस्से सांगितले जातात. पण लष्कर व समर्थ पोलिसांच्या संवदेदनशीलतेमुळे घरात बेशुद्धावस्थेत पडलेल्या एका निराधार ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचल्याची घटना पुण्यात लशंकर परिसरात घडली.

पैरुशस्प दस्तूर ( वय 70, रा. साचापीर, लष्कर) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. दस्तूर हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले असून अविवाहित असल्याने एकटेच राहातात. वयोमानानुसार ते अधूनमधून आजारी असल्याने अनेकदा ते घरातून बाहेर पडत नाहीत. मागील दोन ते तीन दिवसांपासून ते घरातून बाहेर पडताना दिसले नाहीत. त्यांच्या घराचा दरवाजाही आतून बंद होता. त्यामुळे शेजारच्या व्यक्तींनी चारबावडी पोलीस चौकीला याची माहिती दिली.

पोलीस चौकीतील कर्मचारी सलमान शेख व सुरेश पवार यांनी घराकडे धाव घेतली. त्याचवेळी घरासमोर झालेली गर्दी पाहून तेथून जाणारे समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नीलेश साबळे, सुमित खुट्टे त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी लष्कर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने बंद असलेला दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा दस्तूर हे बेशुद्धावस्थेत बेडच्या खाली पडलेले दिसले. पोलिसांनी त्यांना त्वरित त्यांना रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.

साधारणपणे पोलीस ठाण्याच्या हद्दीचे कारण सांगत पोलीस आपली जबाबदारी दुसऱ्या पोलीस ठाण्यावर ढकलण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण घटना लष्कर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडून देखील त्या ठिकाणाहून जात असलेल्या समर्थ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या संवेदनशीलतेमुळे व त्यांनी केलेल्या मदतीमुळे एक ज्येष्ठ नागरिकाचे प्राण वाचले.

हे मदत कार्य लष्कर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस फौजदार दाहोत्रे, पोलीस शिपाई सलमान शेख, सुरेश पवार, समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नीलेश साबळे, सुमित खट्टे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.