Hinjawadi : इंजिनामधील शॉर्टसर्किटमुळे पीएमपीएमएल बसला आग

एमपीसी न्यूज- एमपीसी न्यूज- हिंजवडी येथील इन्फोसिस कंपनीजवळ असलेल्या चौकामध्ये आज, सोमवारी सकाळी 8 वाजता एका पीएमपीएमएल बस पेटल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. पीएमपीएमएल बस पेटण्याची घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन विभागाचे उपअधिकारी डी पी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ते मनपा या मार्गावर धावणाऱ्या 100 क्रमांकाच्या बसमध्ये ही घटना घडली. या बसच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे केबिनमध्ये आग लागली. त्वरित चालकाने प्रवाशांना खाली उतरवले. बसमधून त्यावेळी चार प्रवासी प्रवास करीत होते.

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. बसच्या पुढील भागातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आगीमध्ये बसच्या केबिनचे आणि पुढच्या भागाचे नुकसान झाले.

हिंजवडी एमआयडीसी अग्निशमन विभागाचे अधिकारी आर डी चोरगे, उपअधिकारी डी पी सुतार, फायरमन एम एस खामकर, एच डी नागरगोजे, एस आर पवार, एस एन धुळे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.