Pune : ‘अशा’ प्रकरणांत हॉटेल सील करण्याचा अधिकार पोलिसांना नाही

एमपीसी न्यूज – अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्यानुसार (पिटा) कारवाई केल्यानंतर (Pune) संबंधित हॉटेल मालकाला त्याचे म्हणणे मांडण्यासाठी संधी न देता हॉटेल सील करण्याच्या अधिकार पोलिसांना नाही. असे निरीक्षण उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदवले आहे. पुण्यातील हवेली तालुक्यातील अभिषेक हॉटेल आणि लॉजचे मालक शिरीष शंकर काळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश भारती डांगरे यांनी हा आदेश दिला आहे.

शिरीष काळे यांचे हवेली तालुक्यात अभिषेक हॉटेल आणि लॉज हे हॉटेल आहे. त्यावर पोलिसांनी छापा टाकून हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा दावा केला. त्यात पोलिसांनी हॉटेल मालकावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हॉटेल चालकाला अटक देखील करण्यात आली.

पिटा कायद्यानुसार हॉटेल सील का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस पोलिसांनी शिरीष काळे यांना दिली. त्यावर काळे यांनी त्यांचे म्हणणे दाखल करण्यासाठी वेळ मागितली होती. म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ दिली अथवा नाही, याबाबत पोलिसांनी काळे यांना माहिती दिली नाही.

Chinchwad News : अजितदादांमुळेच मी खासदार होऊ शकलो – डॉ. अमोल कोल्हे

पोलीस हॉटेल सील करण्यासाठी आले असता, हॉटेल सील करण्याचा आदेश झाला असल्याचे काळे यांना समजले. त्यानंतर काळे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. या प्रकरणात म्हणणे मांडण्याची (Pune) संधी मिळावी, अशी मागणी काळे यांनी याचिकेत केली आहे.

पिटा अंतर्गत कारवाई केल्यानंतर पोलिसांना हॉटेल सील करण्याचा अधिकार नाही. तसेच काळे यांच्या प्रकरणात पोलिसांनी हॉटेल मालकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी दिली नाही, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. त्यामुळे हॉटेल सील करण्याचे आदेश रद्दबातल करत हॉटेल मालकाला त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देत पुन्हा कार्यवाही करावी, असा आदेश न्यायाधीश भारती डांगरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.