Pune : मिरवणुकीत डीजेचा वापर करणाऱ्या 10 मंडळांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – ‘आवाज वाढव डीजे तुझ्या आईची शपथ हाय हे गाणे चांगलेच गाजत असले, तरी गणेश मंडळांना विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे सिस्टीम लावणे महागात पडत आहे. उच्च न्यायालयाची बंदी झुगारून सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजेचा दणदणाट करणा-या डेक्कन, चंदननगर, हडपसर, कोथरूड भागातील 10 मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पुण्याच्या उपनगरांमध्ये सातव्या दिवशी उत्साहामध्ये गणपती विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. न्यायालयाने डीजेवरील बंदी कायम ठेवल्याने पोलिसांनी या पूर्वीच त्याबाबत नोटिफिकेशन काढून विसर्जन मिरवणुकीत डीजे लावू नये, असा आदेश दिला आहे. ही बंदी झुगारून अनेक मंडळांनी डीजे लावून मिरवणुका काढल्या.

याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात ‘अभी इम्पॅक्ट लॉजिस्टिक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मंडळावर गुन्हा दाखल केला आहे. मगरपट्टा परिसरात अखिल भोरी भडक मित्र मंडळाच्या डीजेचा आवाज 120 डेसिबल असल्याने पोलिसांनी ‘डीजेचे साहित्य जप्त केले. मांजरी येथील राजहंस गणेश मित्र मंडळाने ‘डीजेचा वापर केल्याप्रकरणी मंडळाचे अध्यक्ष व ‘डीजे मालकावर गुन्हा दाखल केला. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यशवंत तरुण मित्र मंडळ, ज्वाला मित्र मंडळ, विनायक तरुण मित्र मंडळ आणि एकता मित्र मंडळ यांच्यावर कारवाई करून साहित्य जमा केले आहे, तर मंडळाच्या पदाधिका-यांवर आणि कोथरूड येथे स्वराज मित्र मंडळ आणि श्रीकृष्ण मित्र मंडळ यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.