Pune : शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी करणार रोबॉटसची निर्मिती

शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार नववी ‘फर्स्ट टेक चॅलेंज’ स्पर्धा

एमपीसी न्यूज- शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, तंत्रज्ञान व अभियांत्रिकीमध्ये गोडी उत्पन्न व्हावी यासाठी ‘इन्फिनिटी एक्स टेक सिस्टिम्स’ यांच्या वतीने ‘फर्स्ट टेक चॅलेंज इंडिया चँपियनशिप 2019-20’ चे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. सातवी ते बारावी अर्थात 12 ते 18 वर्षे या वयोगटात होणा-या या स्पर्धत देशभरातून विद्यार्थ्यांचे 47 संघ सहभागी होत आहेत.

तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आणि अभियांत्रिकीची तत्त्वे अवलंबून रोबॉट्सची निर्मिती करणे असे या स्पर्धेचे स्वरूप आहे. या वर्षी ‘स्कायस्टोन’ ही स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना असून लोकप्रिय ‘स्टार वॉर्स’ चित्रपटाप्रमाणे अंतराळातील काल्पनिक शहराच्या निर्मितीचे आव्हान यंदाच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. स्पर्धेचे हे नववे वर्ष आहे. येत्या 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रिडा संकुलातील मुष्टीयुद्ध सभागृहात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेतील 2 विजेत्या संघांना अमेरिकेतील डेट्रॉइटमध्ये 28 एप्रिल ते 2 मे 2020 दरम्यान होणा-या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

‘इन्फिनिटी एक्स’चे संस्थापक व प्रमुख कार्यकारी संचालक अश्विन सावंत यांनी ही माहिती दिली. पुण्यासह शिरुर, सातारा, नाशिक, औरंगाबाद, जालना, मुंबई, नवी दिल्ली, राजकोट, अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम् आणि कुरनुल या ठिकाणांहून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. यात शहरी भागातील प्रगत शाळांसह ग्रामीण शाळा व विशेष विद्यार्थ्यांच्या संघांचाही समावेश आहे.

पुण्यातील अंधशाळेतून विद्यार्थ्यांचा एक संघ सहभागी झाला आहे, तर शिरुरच्या ग्रामीण शाळांमधून मुलींचे 4 संघ येणार आहेत. वाई- सातारा येथून शेतमजूर कुटुंबातील मुलांचे 3 संघ तसेच मुंबईच्या धारावी भागातून 1 संघ सहभागी होत आहे. जालना व औरंगाबादच्या ग्रामीण भागातील विद्यर्थ्यांचे 5 संघ, कुरनुल (आंध्र प्रदेश) येथील दुर्गम भागातून 1 संघ, दिल्लीजवळच्या ग्रामीण भागातील 1 संघ यांच्यासह पुणे, दिल्ली, चेन्नई व बंगळुरुमधील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक याप्रमाणे 4 संघ स्पर्धेत सहभागी आहेत.

या सर्व विद्यार्थी संघांना रोबॉट्सच्या निर्मितीसाठी विशिष्ट साहित्याची किटस् पुरवली जातात. त्यातून त्यांनी आपली कल्पनाशक्ती वापरून दिलेल्या विषयावर अधिक चांगली निर्मिती करायची असते. ‘इन्फिनिटी एक्स स्टेम फाऊंडेशन’च्या माध्यमातून सहभागी संघांपैकी १० संघांना मोफत किटस् पुरवली जातात, तर ग्रामीण व विशेष मुलांच्या शाळांना विविध संस्थाकडून किटससाठी आर्थिक मदत मिळाली आहे.

शनिवार, दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. शनिवार व रविवार अशा दोन्ही दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून स्पर्धा होतील, तर रविवार, दिनांक 2 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता केंद्रीय मनुष्यबळ विभागाचे प्रमुख इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे आणि बीव्हीजी इंडियाचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

गेल्या वर्षी भारतातून या स्पर्धेत जिंकलेला संघ अमेरिकेत झालेल्या जागतिक फर्स्ट टेक चॅलेंजमध्ये 8 व्या क्रमांकावर आला होता. या स्पर्धेत अमेरिका व जगभरातून 5000 संघ सहभागी होते.

या स्पर्धेला ‘क्वालकॉम’ आणि ‘विश्वकर्मा विद्यापीठा’चे विशेष साहाय्य लाभले आहे. तसेच ‘एनआरबी बेअरिंग्ज लि.’, ‘पीटीसी’, ‘बीव्हीजी इंडिया’, ‘ट्रॅव्होल्ड’, ‘पतंजली दिव्य जल’, ‘फियाट इंडिया’, ‘मर्सिडीज बेंझ’, ‘केपजेमिनी’, ‘पर्सिस्टंट’, ‘एनव्हिडिया’, ‘सिंबायोसिस स्किल्स ओपन युनिव्हर्सिटी’, ‘हॉलमार्क आऊटडोअर’ यांचेही साहाय्य मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.