Pimpri News : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवला ‘सेमी ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेंसिंग रोबोट’

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गापासून डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांच्या बचावासाठी आकुर्डी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सेमी ऑटोमॅटिक सॅनिटायझर डिस्पेंसिंग रोबोट बनवला आहे.

शाळा व महाविद्यालयात देखील वर्गखोल्या सॅनिटाईझ करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. द्वितीय वर्ष यंत्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी 20 हजार रुपयांत हा रोबोट बनवला आहे.

सेमी ऑटोमॅटिक रोबोटवरती मेकॅनिकल हात आहे. याद्वारे कोणत्याही कानाकोपऱ्यात सॅनिटायझर स्प्रे करता येतो. रोबोटच्या या हाताचा उपयोग पेशंटला औषधे देण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

या रोबोटमध्ये असलेल्या अद्ययावत सिस्टीम नुसार फक्त सॅनिटायझर घेतलेल्या मुलांनाच तो वर्गात प्रवेश देतो. रोबोट इमर्जन्सी चार्जिंग सिस्टीम असून, यातून आपला मोबाईल देखील चार्जिंग करू शकतो.

रोबोटमध्ये ऑटोमेटिक सॅनिटायझर सिस्टीम आहे. यामुळे आपण हात न लावता आपले हात सॅनिटाईझ करू शकतो. रोबोटसाठी स्वतंत्र चार्जर आहे. जो रोबोटला 30 मिनिटांत चार्ज करतो. एकदा चार्ज झालेला रोबोट 45 ते 60 मिनिटे चालू शकतो. हा रोबोट सौर ऊर्जेवर देखील चार्ज होतो.

या रोबोटचे एक वैशिष्ट्ये म्हणजे रोबोटसाठी एक रिमोट तयार करण्यात आला असून, रोबोटला इंटरनेटची गरज पडणार नाही. रोबोटमधील कॅमेरामुळे रोबोट कुठे जात आहे, हे रिमोटवरील लावलेल्या मोबाईलमध्ये दिसू शकते. तसेच, अल्ट्रासोनिक सेन्सरमुळे रोबोट हाताळणे सोपे होते. शंभर मीटर लांब अंतराहून देखील त्याला हाताळता येऊ शकते, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. जत्ती यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय वढाई, संचालक डॉ. निरज व्यवहारे, प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस पाटील, संकुलाचे अध्यक्ष सतेज पाटील यांच्या मदतीने अभिजित बेळीकर (कॅप्टन), सोनू मोरे, शुभम कुंडलवाल, भूपेश पाटील, तुषार जैन, प्रसाद रहाणे आणि प्रसाद गवंडे यांनी हा रोबोट  बनविला आहे.

रोबोटच्या पेटंट फाईलसाठी देखील विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. रोबोटची यशस्वी चाचणी घेण्यात आली असून, भविष्यात रोबोटमध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली जाणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.