Pune: ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना २०१९ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज – ‘पुण्यभूषण फाऊंडेशन’ (त्रिदल, पुणे) आणि पुणेकरांच्या वतीने दिला जाणारा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ पुरातत्वतज्ज्ञ डॉ. गो.बं.देगलूरकर यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार पुरातत्वशास्त्र क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती ‘ पुण्यभूषण फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी पत्रकाद्वारे दिली.

एक लाख रूपये रोख आणि सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरित असलेली बालशिवाजींची प्रतिमा, पुण्याच्या ग्राम देवतांसह असलेल्या या वैशिष्ठपूर्ण स्मृतिचिन्हाने या वर्षीच्या पुण्यभूषण पुरस्कारार्थीना गौरविण्यात येणार आहे.

  • पुरस्काराचे यंदाचे ३१ वे वर्ष आहे. या पुरस्काराबरोबर सीमेवर लढताना जखमी झालेल्या ५ सैनिकांना आणि एका वीरमातेलाही गौरविण्यात येणार आहे. यात वीरमाता लता नायर, रायफल मॅन थानसिंग, ग्रेनेड मॅन बलबीर सिंग, नाईक फुलसिंग, हवालदार प्रमोद सपकाळ, हवालदार गोविंद बिरादार यांचा समावेश आहे.

पुण्यभूषण पुरस्कारार्थींचे नाव पद्मविभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निश्चित केले.
लवकरच हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते. या तीन हुतात्म्यांची प्रेरणा समोर ठेवून ‘त्रिदल’ पुणे संस्थेची स्थापना झाली. या संस्थेने हा पुरस्कार सुरु केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.