Pune: ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज – अनेक मराठी चित्रपटांच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज (मंगळवारी) निधन झाले. दुपारी बारा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 

 

जयराम कुलकर्णी यांच्या मागे पत्नी डॉ. हेमा कुलकर्णी, मुलगा वकील रुचिर, सून अभिनेत्री मृणाल देव- कुलकर्णी, नातू युवा अभिनेता विराजस असा परिवार आहे.

‘अशी ही बनवाबनवी’, ‘थरथराट’, ‘दे दणादण’, ‘धुमधडाका’, ‘झपाटलेला’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘माझा पती करोडपती’,  ‘भुताचा भाऊ’,  ‘आयत्या घरात घरोबा’,  अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. जयराम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून भूमिका साकारल्या. काही दिवसांपूर्वीच जयराम यांनी भूमिका साकारलेला खेळ आयुष्याचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मराठी कलासृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून ते ओळखले जात.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे येथे त्यांचा जन्म झाला.  इयत्ता सातवीत असताना त्यांनी ‘मोरूची मावशी’ नाटकात मावशीची भूमिका साकारली होती. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे 1956 मध्ये आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली.  व्यंकटेश माडगूळकर यांचा सहायक म्हणून जयराम यांची नेमणूक झाली होती. त्यामुळे माडगूळकर यांच्या लेखनाशी जयराम यांचा जवळचा संबंध आला.जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

 

1970 च्या सुमारास जयराम यांनी आकाशवाणीच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनय क्षेत्राकडे वळले. आकाशवाणीमुळे त्या वेळच्या मोठ-मोठ्या कलाकार व साहित्यिकांशी जयराम यांचा परिचय झाला होता. चित्रपटात काम करताना ग्रामीण बोली आणि जयराम हे जणू समीकरणच बनले होते. सुरूवातीच्या काळात सरपंच, पाटील अशा ग्रामीण भूमिका जयराम यांनी चित्रपटांतून साकारल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.