Pimpri: अधिकारी, कर्मचा-यांनो, गांभीर्याने काम करा, अन्यथा कारवाई- आयुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणे ही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी आपआपसात समन्वय राखून प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने गांभीर्याने काम करावे. जबाबदारी पार पाडण्यात कोणी कसूर केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला.

‍ कोरोना विषांणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी कराव्या लागतील. त्याचे पूर्वनियोजन करून ज्या सामुग्रीची आवश्यकता लागेल त्याची तत्काळ खरेदी करावी. नागरीकांमध्ये जनजागृती करून त्यांना या आजाराबाबत कशी दक्षता घ्यावी या बद्दल सर्व स्तरावर मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन करावे.  आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सुरक्षा कर्मचाऱ्यांना आवश्यकतेप्रमाणे मास्क, हातमोजे तसेच निर्जंतूकीकरण द्रव्य (सॅनिटायझर) उपलब्ध करून द्यावे. त्यांना याबाबत प्रशिक्षणही देण्यात यावे.

ज्या विभागातील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी कामकाजानिमित्त थेट संपर्क येतो, त्यांनी स्वत:ची पुरेशी काळजी घेणे गरजेचे असून नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच व्यवहार करावा असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले. विवाहनोंदणी तथा आधारकार्ड नोंदणी साठी येणाऱ्या नागरिकांनी गर्दी करू नये. उद्याने, सार्वजनिक वाचनालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, शाळा आदि ठिकाणी नियुक्त असलेल्या मनुष्यबळाचा वापर करोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी करून घेतला जाणार आहे. शिवाय महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सतर्क रहावे असा आदेश हर्डीकर यांनी दिला.

केंद्र तसेच राज्यशासनाकडून कोरोना विषाणू आजारासंदर्भात प्राप्त झालेल्या सुचना आणि आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची दक्षता सर्व विभागप्रमुखांनी घ्यावी. तसेच महापालिका स्तरावर निर्गमित होणाऱ्या विविध आदेश आणि सुचनांचे पालन करण्यासाठी अंतर्गत समन्वय ठेवून काम केल्यास आलेल्या संकटावर मात करणे सहज शक्य असल्याचेही आयुक्त हर्डीकर बैठकीत म्हणाले.

अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, शहर अभियंता राजन पाटील, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीळकंठ पोमण, मुख्य अग्निशमन अधिकारी किरण गावडे, मुख्यलेखापाल जितेंद्र कोळंबे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, प्रशांत जोशी, अण्णा बोदडे, संदिप खोत, स्मिता झगडे, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, आशादेवी दुरगूडे, बाळासाहेब खांडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे, संजय भोसले, देवण्णा गट्टूवार, शिरीष पोरेड्डी आदींसह क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी, महापालिकेच्या रूग्णालयांचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाचे समन्वयक उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, मृणालिनी सावंत, सुनील गाडे बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.