Pune : माझ्या घरासह पाण्याचे नियोजन करावे लागणार- पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुणे शहरात पाणी प्रश्न गंभीर बनला असून पुणेकरांनी पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले आहे. पाणी संकट हे मानवनिर्मित नसून निसर्ग निर्मित असल्याची भूमिका त्यांनी मांडली. माझ्या घरासह पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे असेही ते म्हणाले. ते आज पुण्यात पत्रकारपरिषदेत बोलत होते. 

पुणे शहराची लोकसंख्या विचारात घेता पुणे महापालिका 1350 एमएलडी पाणी घेत होती. मात्र महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानुसार आता पुणे शहराला 650 एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आदेशामुळे पुण्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. आज स्मार्ट सिटी योजनेची बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश बापट यांना पाणी प्रश्नावर प्रश्न विचारण्यात आला.

गिरीश बापट म्हणाले, ” यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या चार धरणात 20 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यापूर्वीच जलसंपदा आणि महापालिका प्रशासनामार्फत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या आदेशानुसार आता माझ्या घरासह पाण्याचे नियोजन करावे लागणार असून पाणी प्रश्नावर कोणी ही राजकारण करू नये. असेही ते म्हणाले.

जुलै महिन्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यात येत असून पाणी प्रश्न गंभीर असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.