Pune : ‘महाशिव आघाडी’त सहभागी व्हायचे की नाही?, याचा निर्णय वरिष्ठांना विचारून घेणार -वसंत मोरे

एमपीसी न्यूज – काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना महाशिव आघाडीत सहभागी व्हायचे की नाही?, याचा निर्णय वरिष्ठांना विचारून घेणार असल्याचे मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी सांगितले.

पुणे महापालिका महापौर-उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. महाशिव आघाडीत मनसेनेही सहभागी व्हावे, यासाठी विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी वसंत मोरे यांची कार्यालयात जाऊन आज भेट घेतली. भाजप विरोधात महापौर-उपमहापौर पदासाठी प्रत्येकी 1 – 1 च उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. मनसे महाशिव आघाडीत सहभागी झाली तर, विरोधी पक्षांच्या नगरसेवकांची संख्या 65 होते. तर, भाजपकडे 99 नगरसेवक असल्याने त्यांचा महापौर-उपमहापौर पद होणार असल्याचे निश्चित आहे.

भाजपमध्ये महापौर पदासाठी कमालीची स्पर्धा आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत ज्यांना डावलण्यात आले होते. त्यांच्या नावाचा महापौर पदासाठी विचार केला जाऊ शकतो. उपमहापौर पद आरपीआय (आठवले गट) लाच देणार असल्याची चर्चा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.