Pune : लग्न कर म्हणून समजावून सांगितल्यामुळे तरुणाने केला महिलेच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- ‘ तू लग्न का करत नाही? तू लग्न करून घे’ असे समजावून सांगणाऱ्या महिलेच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 7) दुपारी सव्वा एकच्या सुमारास यशवंतनगर, खराडी येथे घडली.

रमा सदाशिव धावनपल्ली (वय 48, रा.यशवंतनगर, खराडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. अतुल सावळाशंकर रासकर (वय 30, रा. यशवंतनगर खराडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिलेचे पती सदाशिव धावनपल्ली (वय 54, रा.खराडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सदाशिव धावनपल्ली यांचा मुलगा राकेश याचा मित्र अतुल याला सदाशिव आणि त्यांची पत्नी या दोघांनी काही दिवसांपूर्वी ‘ तू लग्न का करत नाही? तू लग्न करून घे’ असे समजावून सांगितले होते.

या गोष्टीचा राग मनात धरून अतुलने सदाशिव यांच्या पत्नी रमा या घरामध्ये एकट्याच असताना त्यांच्या घरी गेला. रामा यांच्याकडे पाणी मागण्याचा बहाणा केला. जेव्हा रमा या पाणी आणण्यासाठी किचनमध्ये निघाल्या त्या दरम्यान अतुलने त्यांच्या पाठीमागे जाऊन त्यांच्या डोक्यामध्ये कुऱ्हाड मारून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रमा या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी अतुल याला अटक केली असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.