Pune : तरुणाईच्या आश्वासक सादरीकरणाने रंगला ‘युवोन्मेष’ 18 व्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवात युवा प्रतिभेला रसिकांची भरभरून दाद

एमपीसी न्यूज – अभिजात संगीताच्या क्षेत्रातील तरुणाईच्या आश्वासक सादरीकरणाने पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवातील युवोन्मेष या सत्राचा पूर्वार्ध शनिवारी (दि.30) सकाळी रंगतदार ठरला. युवा कलाकारांच्या गायन-वादनाला रसिकांनीही भरभरून दाद दिली.

महोत्सवाचे आयोजक आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य व सुपुत्र पं शौनक अभिषेकी, माजी विरोधी पक्ष नेते उज्ज्वल केसकर, बढेकर समूहाचे प्रवीण बढेकर, आपला परिसर संस्थेचे अध्यक्ष महेश पानसे, विद्येश रामदासी आदी उपस्थित होते.

उज्ज्वल केसकर, आपला परिसर आणि तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या पं. जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या सत्रात युवा कलाकारांनी आपल्या कलाविष्काराची छाप पाडली. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा संगीत महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे हे 18 वे वर्ष आहे. महोत्सव सर्व संगीत रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.

यावर्षी महोत्सवासाठी बढेकर गृप आणि विलास जावडेकर डेव्हलपर्स, लोकमान्य मल्टपर्पज को ऑपरेटिव्ह बँक लि., अंशुमन टेक यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दुसऱ्या दिवशीच्या ‘युवोन्मेष’ सत्राची सुरुवात यश कोल्हापुरे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मनोरंजनीमध्ये विलंबित एकतालात ‘नाम तिहारो’ हा बडा ख्याल आणि त्याला जोडून ‘आज सखी आनंद भयो है’ ही झपतालातील रचना सादर केली. या दोन्ही रचना पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या आहेत. यश यांनी त्यानंतर पं. हेमंत पेंडसे रचित तीन तालातील तराणाही सादर केला. पं. अभिषेकी यांनी गाजवलेल्या ‘आम्ही विठ्ठलाचे वारकरी’ या भक्तीरचनेने त्यांनी गायनाची सांगता केली. त्यांना कौशिक केळकर (तबला), अथर्व कुलकर्णी (संवादिनी) तसेच सुरेंद्र वैद्य आणि प्रसाद कुलकर्णी यांनी तानपुरा साथ केली.

Jalna : वसंत मोरे यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

त्यानंतर युवा सरोदवादक नितीश पुरोहित यांनी राग जौनपुरी छेडला. आलाप, जोड अशा क्रमाने रागरूप उलगडत त्यांनी रूपक तालात वादन केले. त्यानंतर तीन तालातील रचना पेश करून त्यांनी वादनाची सांगता केली. सकाळच्या सत्रातील त्यांच्या वादनाचे धीरगंभीर सूर वातावरण निर्मिती करणारे ठरले. त्यांना तबल्यावर किशोर कोरडे यांनी अनुरूप साथ केली. वादनाच्या उत्तरार्धातील सवाल जवाब दाद मिळवणारे ठरले.

युवोन्मेष या सत्राची सांगता तरुण गायक भाग्येश मराठे यांच्या बहारदार गायनाने झाली. भाग्येश यांनी समयानुकूल अशा वृंदावनी सारंग रागात ‘पिया नाही मानत करत चतुराई’ हा स्वरचित ख्याल विलंबित तीन तालात सादर केला. त्यापाठोपाठ गुरू पं. केदार बोडस रचित ‘ऐसो ब्रिजवासी’ (मध्यलय तीनताल) आणि ‘मुरली बजावे कान्हा’ (द्रुत तीनताल) या बंदिशी सादर केल्या. रसिकांच्या आग्रहाला मान देत त्यांनी हिंडोलबहार रागातील रचनांचे सादरीकरण केले. त्यांना प्रणव गुरव (तबला), सौमित्र क्षीरसागर (संवादिनी) तसेच क्षितिज डिंगोरे व सागर चावरिया (तानपुरा) यांनी पूरक साथ केली. प्रारंभी सर्व कलाकारांचे सत्कार मकरंद केळकर, पं. राजा काळे, पं. सुधीर नायक, अभेद अभिषेकी यांच्या हस्ते करण्यात आले. नियती विसाळ यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.