Purushottam Days Part 2: पुरुषोत्तम डेज भाग 2- तृतीय पारितोषिक विजेती एकांकिका ‘भाग धन्नो भाग’!

एमपीसी न्यूज कला संवाद (श्रीपाद शिंदे) –  महाराष्ट्र कलोपासक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेने आतापर्यंत हजारो कलाकार रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला दिले आहेत. कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याचे आणि स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक महाविद्यालयांचे संघ जीवापाड मेहनत करतात. स्पर्धेपेक्षा स्पर्धेच्या तयारीचे दिवस म्हणजेच ‘पुरुषोत्तम डेज’ मधून कलाकार घडत जातो. यंदाच्या वर्षी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चार संघानी ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या आमच्या व्यासपीठावर हजेरी लावली आणि ‘पुरुषोत्तम डेज’मधील आठवणींना उजाळा दिला. दुसऱ्या भागात पाहूयात तृतीय एकांकिकेसाठी दिला जाणारा संजीव करंडक पटकविणाऱ्या पुण्याच्या गणेश खिंडीतील मॉडर्न महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेच्या संघाशी श्रीराम कुंटे यांनी केलेली बातचीत… 

‘पुरुषोत्तम’मधील  संजीव करंडक विजेती एकांकिका ‘भाग धन्नो भाग’!

‘एमपीसी न्यूजने सुरु केलेल्या ‘एमपीसी न्यूज कला संवाद’ या उपक्रमाच्या ‘पुरुषोत्तम डेज’ या मालिकेच्या दुसऱ्या भागात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविलेल्या गणेश खिंड (पुणे) येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘भाग धन्नो भाग’ या नाटकाच्या टीमसोबत गप्पा रंगल्या. ‘कोविडला आम्ही केंव्हाच मागे सोडले आहे. आता शो मस्ट गो ऑन’ असे ठाम मत ‘भाग धन्नो भाग’च्या कलाकारांनी व्यक्त केले.

‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेला पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सांघिक तृतीय क्रमांक मिळाला आहे. त्यानिमित्ताने नाटकाच्या टीमसोबत एमपीसी न्यूज कला संवादमध्ये गप्पा झाल्या. सिद्धेश नेवे याने या नाटकातील दिग्दर्शन आणि मुख्य पात्र केले आहे. हे नाटक दोन पिढ्यांमधील विचारांचा मेळ घालणारे आहे. घराघरात राबणा-या आईची कहाणी यात मांडली आहे. घरातील निर्जीव वस्तू सुद्धा घरातील महिलेसाठी एक सदस्यच असते. त्या निर्जीव वस्तूच्या घरात नसण्याची कल्पना देखील महिलेला करवत नाही. अनेक आठवणी, ऋणानुबंध त्यासोबत जोडले गेले असतात, हीच कथा ‘भाग धन्नो भाग’ या एकांकिकेतून मांडली आहे.

‘सखी सोबती होतीस तू, मनी सारखी होतीस तू. विणता विणता नाती गोती, स्मृतीत धूसर झालीस तू.’ या ओळींमधून नाटकाचा आत्मा प्रेक्षकांच्या लक्षात येतो. नाटक वाचण्यापासून ते सादर करण्यापर्यंत प्रत्येकाने प्रत्येकाला सांभाळून घेतले. प्रत्येक पात्राची चर्चा झाली आणि नाटक बसलं. नाटकातील कथा प्रत्येक घरात घडणारी आहे. त्यामुळे नाटक पाहताना ही कथा आपल्या घरातील असल्याचा भास होतो, असे दिग्दर्शक सिद्धेश नेवे सांगतो.

तनया जाधव हिने नाटकातील आईचे पात्र केले आहे. पात्राचे नाव शुभा असे आहे. तनया हिला तिच्या बालपणीच नाटकाचे बाळकडू मिळाले आहे. तनया लहान असताना तिचे आई, वडील आणि तनया या तिघांनी एक नाटक केले होते. त्यात आई, वडील आणि मुलगी अशाच भूमिका होत्या. तिथूनच तिच्या नाट्य प्रवासाला सुरुवात झाली असल्याचे तिने सांगितले. ‘भाग धन्नो भाग’ या नाटकाची तालीम करताना खूप हसण्याचे, विसरण्याचे प्रसंग घडले, ते खूप वर्ष लक्षात राहतील, असेही ती म्हणते.


गिरीश कुलकर्णी याने ‘भाग धन्नो भाग’ या नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. तसेच त्याने सेल्समनचे एक पात्र देखील केले आहे. नाटकातील पात्र काम करत असताना ते प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईट्स खूप मदत करतात. प्रकाश योजना का काही वेळेला दुर्लक्षित होणारा भाग आहे. पण नेपथ्य, वेशभूषा, संगीत, दिग्दर्शन याप्रमाणेच लाईट हा भाग देखील महत्वाचा असल्याचे गिरीश कुलकर्णी याने सांगितले.

प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात एनर्जी पास होण्याची जागा म्हणजे नाट्यगृह. नाटकातील प्रसंगांचा लाइव्ह एक्स्पीरियंस घेणं हीच नाटक पाहण्यातली मजा आहे. त्यामुळे मोबाईलवर, टीव्हीवर नाटक पाहणे हे चांगल्या प्रेक्षकाचे लक्षण नाही. ओटीटी वरून प्रेक्षकांची दाद मिळत नाही. तिथे केवळ कमेंट मिळतात. ओटीटी वरील कमेंटला प्रेक्षक प्रत्यक्ष भेटून जी दाद देतात, त्याची सर येत नाही, असे गिरीशचे मत आहे.


‘भाग धन्नो भाग’ या नाटकाचे संगीत देखील चपखल आहे. रोहन ढोरे याने हे संगीत केले आहे. कंपोजिशन आणि ऑपरेटिंग देखील रोहन यानेच केले आहे. या नाटकासाठी संगीत कंपोज करताना ढोलकी, सतार अशा वाद्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. रोहन याने नाटकातील सहकारी आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करून संगीत केले असल्याची आठवण तो सांगतो.

साक्षी कोंडलकर, कोमल सोनावणे, समीर मोहोळ यांनी बॅकस्टेज केले आहे. समीरचे हे पहिलेच नाटक आहे. बॅकस्टेजची माहिती नसतानाही त्याने त्याची माहिती करून सर्व गोष्टी केल्या. बॅकस्टेज करताना बारीक बारीक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. बॅकस्टेज करणा-याने स्वतःचे घर समजून काम करणे गरजेचे आहे, असे समीर मोहोळ सांगतो. आदिती फाटक हिने ‘भाग धन्नो भाग’ या नाटकात गायन केले आहे.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत बक्षीस घेतल्यानंतर या टीमने व्यावसायिक प्रयोग देखील करायला सुरुवात केली आहे. 27 मार्च रोजी पुण्यातील भरत नाट्यमंदिरात दुपारी एक ते चार ‘भाग धन्नो भाग’ चा प्रयोग आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.