Khandala News : भर उन्हात सात तास वाहनातच, ना पाणी ना काही सूचना ; ट्राफिक जामनंतर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाखाली आज (दि.26) पहाटे 5.30 वा केमिकल घेऊन जाणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईला जाणार मार्ग बंद झाला. वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटर रांगा लागल्या. साडे सात तासानंतर मार्ग मोकळा झाला व वाहतूक पूर्वपदावर आली. मात्र, सात तास वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून, वाहतूक कोंडीची कोणतीही पूर्व सूचना मिळाली नसल्याची तक्रार केली.

पहाटे अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर केमिकल रस्त्यावर पसरले, त्यांवरून वाहने सरकू लागल्याने सुरक्षेच्या कारणास्तव मार्गिका बंद करण्यात आली. तोपर्यंत वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली. केमिकल बाजूला करून दुपारी एकच्या सुमारास मार्ग खुला करण्यात आला. पण, एवढा वेळ थांबून राहिलेली वाहनामुळे 4 ते 5 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. भर उन्हात सात तासांहून अधिक काळ गाडीतच बसून राहीलेल्या प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांनी ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

मुंबई ते पुणे प्रवास करणा-या एका महिलेने फेसबुकवर अपघात आणि ट्रॅफिक जामची माहिती दिली. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून, हजारो प्रवासी भर उन्हात ताटकळत थांबले आहेत. एवढं मोठं ट्रॅफिक जाम झाले असताना रस्त्यावरती एकही पोलीस कर्मचारी दिसला नाही, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे. दुस-या महिलेने ट्रॅफिक जामचा व्हिडीओ शेअर करत, लोणावळा घाटात दीड तास अडकून पडल्यानंतर मी नुकतेच या ट्रॅफिकमधून बाहेर पडले आहे. यापूर्वी शनिवारी रविवारी महामार्गावर एवढे ट्रॅफिक पाहिले नाही. महामार्गावर जिकडे पहावे तिकडे केवळ ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे.

एक प्रवाशांनी सांगितले की, तासंतास महामार्गावर अडकून पडलोय ना पाणी आहे, ना जेवण ना कलसी सुविधा. अजून किती वेळ थांबावे लागेल हे सांगता येत नाही, तोपर्यंत पाण्याविना जीव कासावीस झाला आहे.

 

एका वाहन चालकाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत माहिती दिली की, वाकड येथून 11.30 वा प्रवास सुरू केला, 12 वाजल्यापासून ट्रॅफिकमध्ये अडकून पडलो आहे. आता 2.22 वाजल्या आहेत तरीही ट्रॅफिक मध्येच आहे. अजून लोणावळा देखील क्रॉस केलेला नाही. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचा निष्काळजीपणा आणि चुकीचे नियोजन.

दुस-या ट्विटर युझरने महाराष्ट्र पोलिसांना दोष देत निकृष्ट नियोजन असल्याचे मत व्यक्त केले. हजारो लोक सकाळपासून वाहतूक कोंडीत अडकून पडलेत आणि मागील सात तासांत एक इंच देखील वाहन जागेवर हललेले नाही.

दरम्यान,  काही प्रवाशांनी ट्रॅफिक जाममध्ये प्रवाशांना मदत न करता पोलीस ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या चालकांचे सीट बेल्ट चेक करून दंड अकारणी करत असल्याचे सांगितले. दंडाची पावती देखील त्यांनी ट्विटरवरती शेअर केली.

पुणे – मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूक सुरळीत सुरू असून, अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहीती महामार्ग पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.