Ravan Gang : रावण टोळीच्या म्होरक्याला पुणे पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड मधील कुख्यात रावण टोळीचा म्होरक्या अनिरुद्ध (Ravan Gang)जाधव आणि त्याच्या साथीदाराला पुणे पोलिसांनी अटक केली. नंबर नसलेली काळ्या काचा लावलेली गाडी अडवून पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी जाधव आणि त्याच्या साथीदाराकडे पिस्टल आढळून आले.

अनिरुद्ध उर्फ विकी बाबुराव जाधव (वय 26, रा. रावेत), निखील राजू सरोदे (वय 30, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.


याबाबत माहिती अशी की, वारजे येथील सह्याद्री शाळा चौकात वारजे वाहतूक पोलीस वाहतुकीचे नियमन करत होते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विविध कारवाया केल्या जात आहेत. वाहतूक पोलिसांकडून काळ्या काचा असलेल्या वाहनांवर कारवाईची विशेष मोहीम सुरु आहे. सह्याद्री शाळा चौकातून काळ्या, हिरव्या रंगाची नंबर प्लेट नसलेली आणि काचा काळ्या असलेली थार गाडी जाताना दिसली. वाहतूक पोलिसांनी गाडी थांबवली.

Raigad: वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

गाडीमध्ये दोघेजण होते. त्यांच्याकडे नंबर प्लेट आणि इतर चौकशी करत असताना पोलिसांना त्यांच्यावर संशय आला. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी वारजे माळवाडी पोलिसांची मदत घेतली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस दिसताच गाडीतील दोघांनी दोन दिशेला धूम ठोकली. त्यांची गाडी तिथेच सोडून आरोपी पळून गेले.

पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता जाधव याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे तर सरोदे याच्याकडे एक देशी बनावटीचे पिस्टल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जाधव आणि सरोदे हे पिंपरी-चिंचवड परिसरातील सराईत गुन्हेगार आहेत. जाधव हा रावण टोळीचा म्होरक्या असून त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.