Chinchwad : स्वर, सूर आणि तालाच्या अपूर्व आविष्काराने भाविक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – ‘जागर स्त्रीशक्तीचा… सूर गृहलक्ष्मीचा!’ हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या(Chinchwad) सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडेकर यांच्या शिष्या ज्योती गोराणे आणि त्यांच्या सहकारी यांनी ‘स्वर जोर्तिमय शाम’ या भक्तिसंगीताच्या मैफलीच्या माध्यमातून बुकॉऊ वुल्फ कॉलनी पटांगण, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथे सोमवारी तृतीय पुष्पाची गुंफण केली.

श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाने पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन (Chinchwad)उत्सव 2024 चे आयोजन केले होते. ज्येष्ठ स्वामीभक्त मधू जोशी, मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील), उपाध्यक्ष दीपक टाव्हरे, सचिव संजय आधावडे, सहसचिव मीनल देशपांडे, खजिनदार गणपती फुलारी, सदस्य शंकर बुचडे, नितीन चिंचवडे (पाटील), हेमा दिवाकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

“अशक्यही शक्य करतील स्वामी…” या प्रार्थनेने मैफलीचा प्रारंभ करण्यात आला. “स्वामी समर्थ महामंत्र हा…” , “ओंकार अनादि अनंत…” , “कधी लागेल रे तुला गोडी अभंगाची…” या रचनांनी भक्तिमय वातावरणाची निर्मिती झाली. स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या मूळ आवाजातील “राजस सुकुमार मदनाचा पुतळा…” या तुकोबांच्या अभंगाचे जोरदार सादरीकरण दाद मिळवून गेले; तर “पांडुरंग नामी लागलासे ध्यास…” ही रचना श्रोत्यांना भावली; तसेच “श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीनेमें…” या ब्रज भाषेतील भक्तिरचनेला टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. “वाट दिसू दे…” या युगुलस्वरातील शेतकरी गीताने श्रोत्यांना वेगळ्या विश्वात नेले; आणि “हरी म्हणा तुम्ही, गोविंद म्हणा…” या गीताने पुन्हा भक्तिरसात भिजविले.

लोकाग्रहास्तव सादर केलेल्या “अंजनीच्या सुता…” या गीताने रसिक प्रसन्न झाले. “खंडेरायाच्या लग्नाला…” या गीतापासून सुरू झालेल्या जागरण – गोंधळ गीतांच्या मालिकेने रसिकांना अक्षरश: डोलायला लावले. मुख्य गायिका ज्योती गोराणे यांचा सहजपणे टिपेला पोहोचणारा स्वर, सहगायिकांचा सुरेल कोरस, तबला – ढोलकी – संबळ – संवादिनी यांसह अन्य वाद्यांची नेटकी साथ यामुळे मैफल रंगात आली. अर्थातच रसिकांनी ‘वन्स मोअर’चा शिक्कामोर्तब केले. रूना लैला यांच्या मूळ आवाजातील सिंध प्रांतातल्या “दमा दम मस्त कलंदर…” या सूफी कव्वालीचे रसिकांनी जोरदार स्वागत केल्यानंतर यमनकल्याण रागातील विविध सुप्रसिद्ध रचना सादर करीत गायक – वादकांनी रसिकांना भरभरून श्रवणानंदाची अनुभूती दिली. त्यानंतर सोहम गोराणे या किशोरवयीन कलाकाराने एकल तबलावादन केले.

Raigad: वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

कार्यक्रमाच्या दरम्यान मंडळाच्या वतीने बाबासाहेब दंडवते यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. दंडवते कुटुंबीयांनी पुरस्कार स्वीकारला. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘स्वर जोर्तिमय शाम’ या सांगीतिक मैफलीत सोमवती अमावस्येच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या “बांगड्यांची माळ…” या गोंधळ गीतांच्या मालिकेने रसिकांना स्वर, सूर आणि तालाच्या अपूर्व आविष्काराने मंत्रमुग्ध केले. विशेषत: तबला, ढोलकी आणि संबळ यांच्या जुगलबंदीला रसिकांनी उत्स्फूर्त टाळ्यांच्या ठेका धरला होता. संत एकनाथ महाराजांच्या “गुरू माता, गुरू पिता…” या भैरवीने मैफलीची सांगता करण्यात आली. शाम गोराणे यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली गायिका ज्योती गोराणे यांना राधिका साकोरे आणि भक्ती कापसे यांनी स्वरसाथ दिली. गौरी वनारसे (संबळ), लक्ष्मी कुडाळकर (ढोलकी), संतोष खंडागळे (सिंथेसायजर), सचिन खंडागळे (ऑक्टोपस), भक्ती कापसे (संवादिनी) यांनी साथसंगत केली. सुनीताराजे निंबाळकर यांनी निवेदन केले.

उत्सवात पहाटे 4.30 वाजता श्रींचा फळांच्या रसाने अभिषेक आणि पूजा, श्रींची आरती, स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण सोहळा; तसेच महानैवेद्य आणि आरती, सायंकालीन आरती इत्यादी धार्मिक विधी संपन्न झाले. कैलास भैरट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.