Mumbai : नामवंत ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

एमपीसी न्यूज – हिंदी चित्रपट सृष्टीला सलग दुसऱ्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. हरहुन्नरी कलाकार इरफान खान यांच्या पाठोपाठ आज (गुरुवारी) बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (वय 68) यांचे कर्करोगाने निधन झाले. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऋषी कपूर यांच्यावर एक आठवड्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. सलग दोन दिवसांत दोन गुणी कलाकार गमावल्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 

ऋषी कपूर यांनी जवळपास 92 चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग आहे. ‘मेरा नाम जोकर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. ‘बॉबी’, ‘दामिनी’,’दो दुनी चार’, ‘कर्ज’, ‘प्रेमरोग’, ‘चांदनी’ या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे 17 हून अधिक चित्रपट सुपरहिट ठरले होते.

कर्करोगातील गुंतागुंतीमुळे त्यांना मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारादरम्यान त्यांना अनेक वेळा कृत्रिम श्वासोश्वास द्यावा लागत होता. कालपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी ऋषी कपूर यांच्या पत्नी व ज्येष्ठ अभिनेत्री नीतू सिंह या त्यांच्यासोबत रुग्णालयात होत्या. ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट अमिताभ यांनी केले आहे.

ऋषी कपूर मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतील न्यूयॉर्कमधून कर्करोगावर इलाज करुन मुंबईत परतले होते. या उपचारादरम्यान ऋषी कपूर अमेरिकेतील रुग्णालयात 11 महिने आणि 11 दिवस होते. तिथून परतल्यानंतर उपचार यापुढेही सुरु राहतील आणि ठणठणीत बरे होण्यासाठी अजून काही काळ लागेल, असे त्यांनी स्वतः सांगितले होते. न्यूयॉर्कमध्ये उपचारादरम्यान ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूर आणि त्याची गर्लफ्रेण्ड आलिया भट यांच्यासह दीपिका पदुकोन, शाहरुख खान, आमीर खान, अनुपम खेर यांसारख्या अनेक कलाकारांनी ऋषी कपूर यांची भेट घेतली होती. स्वत: ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांनीही सोशल मीडियावर हे फोटो शेअर केले होते.

न्यूयॉर्कहून परतल्यानंतर ऋषी कपूर यांनी ‘द बॉडी’ नावाच्या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात त्यांच्यासोबत इम्रान हाश्मी आणि शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत होत्या. चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.