Thergaon News : पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात अपना वतन संघटनेचे उपहासात्मक आंदोलन

एमपीसी न्यूज – देशात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस यांच्या दरामध्ये भरमसाठ वाढ होत आहे. पेट्रोल डिझेलच्या दराने तर शतक पार केले आहे.

त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ करून पेट्रोल डिझेलला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त करून दिले आहे. तसेच आतापर्यंत कोणत्याही सरकारला शक्य न झालेले इंधन दरवाढ करून भाजप सरकारने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. अशी खोचक टीका करत अपना वतन संघटनेच्या वतीने नागरिकांना गांधीगिरी पद्धतीने पेढे वाटून केंद्रसरकारचे उपहासात्मक अभिनंदन करण्यात आले.

अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आलेल्या या आंदोलनात संघटनेचे पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष हमीद शेख, संघटनेच्या महिला शहराध्यक्ष राजश्री शिरवळकर, संघटक निर्मला डांगे, रियाज शेख आदी उपस्थित होते.

यावेळी अपना वतन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षावाले , सिग्नल वरील नागरिक, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेलेले नागरिक, गॅस सिलेंडर आणण्यासाठी गेलेले नागरिक, भाजीविक्रेते यांना पेढे वाटून पेट्रोल डिझेल दरवाढीचा गांधीगिरी पद्धतीने निषेध केला. या माध्यमातून पेट्रोल डिझेल दरवाढीची तीव्रता, इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेवर होणारे आर्थिक दुष्परिणाम याची जाणीव करून देण्याचा संघटनेने प्रयत्न केला.

यावेळी अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या . त्यांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून सरकारविरोधातील असंतोष प्रदर्शित होत होता. यावेळी नागरिकांनी केंद्र व राज्य सरकारला इंधन दरवाढ व घरगुती गॅस दरवाढ मागे घेण्याची विनवणी करण्यात आली.

संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख म्हणाले, कोरोनामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. तसेच सर्वसामान्य जनता त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक व घरातील वैद्यकीय खर्चाची सांगड घालताना व्याकुळ झाली आहे. घरखर्च चालवताना नाकीनऊ येत आहेत. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने आपापल्या अखत्यारीत असलेले टॅक्सेस कमी करून इंधन दर कमी करावेत व सर्वसामान्यना दिलासा द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.