River Police : किर्लोस्कर वसुंधरा चित्रपट महोत्सवातून पिंपरी-चिंचवड येथे ‘रिव्हर पोलीस’ उपक्रमाची सुरुवात

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड येथे वसुंधरा क्लबच्या (River Police) सहयोगाने जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे होणा-या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे बुधवारी (दि.9) ताथवडेच्या शाहू कॉलेजमध्ये उद्घाटन करण्यात आले. महोत्सवाचे औचित्य साधून पर्यावरणाला पूरक असलेल्या ‘रिव्हर पोलीस’ उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महोत्सवात विलो मॅथर अँण्ड प्लेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वाटवे, के.पी.एल चे प्रमुख आनंद चितळे, चिंचवड देवस्थानचे विश्वस्त मंदार महाराज, जे.एस.पी.एम.चे संचालक डॉ. आर. के. जैन आणि डॉ. रवी जोशी, महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, जलदिंडी प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. विश्वास येवले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

रिव्हर पोलीस या अभिनव उपक्रमाबाबत जलदिंडीचे जल (River Police) वारकरी ओमकार गौरीधर म्हणाले की, नदीचे पाणी शुद्ध राहण्यासाठी रिव्हर पोलीस कार्यरत राहणार आहेत. नदीप्रदूषण ही येत्या काळात मोठी समस्या होत असून याला आळा घालण्यासाठी रिव्हर पोलीस उपक्रम सुरु करत आहोत. या माध्यमातून पवना नदीचा दापोडीपर्यंतचा घाट स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक ठिकाणच्या ग्रामस्थांमध्ये जागृती केली जाईल.

यासाठी कॉलेजचे विद्यार्थी, ग्रामस्थ, शाळेचे विद्यार्थी यांची रिव्हर पोलीस म्हणून तयार केलेली टीम नदी स्वच्छतेकडे लक्ष देईल. यासाठी शहरात प्रशिक्षित केलेल्या विद्यार्थ्यांच्या 27 टीम कार्य करतील. शहरातील नदीघाटाचा 2 किलोमीटरचा परिसर वाटून घेतला जाईल त्या – त्या ठिकाणी पाण्याची गुणवत्ता पाहून आवश्यक झाडांचे रोपण केले जाईल. दर 15 दिवसांनी याचा रिपोर्ट महापालिका, राज्यशासनाला पाठवण्यात येईल असे गौरीधर यांनी सांगितले.

 

याविषयी बोलताना हेमंत वाटवे म्हणाले की, मानवाची मूळ प्रवृत्ती ही संचयाची आहे. या प्रवृत्तीमुळे  पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. काही वर्षांपूर्वी सलग 18 तास पाणी पिंपरी चिंचवड शहराला पुरवले जात होते. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे यावर परिणाम होत आहे. वॉटर प्युरिफायरच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाड़ी होत असून पाण्यातील आवश्यक घटक मिळानासे झाले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर पाण्यासह हवा विकत घेण्याची वेळ येत्या काळात येऊ शकते. नागरिकांना पर्यावरणसंवर्धनासाठी जागरुक राहणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

या महोत्सवाचा विषय ‘सकस अन्न, समृद्ध निसर्ग आणि आरोग्यपूर्ण समाज’ हा आहे.  महोत्सवाच्या विषयाला अनुसरून चित्रपट दाखवले जाणार आहेत. शॉर्ट फिल्म व बेस्ट आउट ऑफ वेस्ट अशा स्पर्धा होणार आहे. महोत्सवा दरम्यान वेगवेगळ्या विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली आहेत. ग्रीन बझार आणि औषधी वनस्पतींचे प्रदर्शन हे या महोत्सवाचे खास आकर्षण असून हे प्रदर्शन मोरया गोसावी मंदिराच्या प्रांगणात  होणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी आयडीया चॅलेंज 2022 हे विशेष चर्चासत्र देखील आयोजित करण्यात केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.