Pimpri News: जलदिंडी प्रतिष्ठानतर्फे पवनेच्या संवर्धनासाठी आता ‘रिव्हर पोलीस’ उपक्रम; 18 महाविद्यालये, ग्रामस्थांचा सहभाग

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या पवना नदीच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविणा-या जलदिंडी प्रतिष्ठानच्या माध्यमातून महापालिका, पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने आता  ‘रिव्हर पोलीस’ हा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.

पवना नदीच्या उगमापासूनच्या 42 किलोमीटर अंतरापैकी खालुंब्रे ते दापोडी दरम्यानचे 24 किलोमीटर नदी पात्रातील पाणी ‘बीओडी’ आणि ‘सीओडी’मुळे वापरण्याजोगे राहिले नाही. त्यासाठी शहरातील 18 महाविद्यालयांना प्रत्येकी दोन-दोन किलोमीटर नदी पात्राची स्वच्छता, देखभाल, प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे दायित्व सोपविण्यात येणार आहे. ग्रामस्थ देखील सहभागी होणार असलेल्या या उपक्रमाला 9 नोव्हेंबर 2022 पासून सुरुवात होणार आहे.

याबाबतची माहिती जलदिंडी प्रतिष्ठानचे ओंकार गौरीधर, राजीव भावसार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. जलदिंडीने  महापालिका  आणि पोलीस आयुक्तालय यांच्या सहकार्याने नदी पोलीस (River Police) ही संकल्पना 2019 मध्येच सुरू करण्याचे निश्चित केले होते. परंतु, कोरोनामुळे ते लांबणीवर पडले. आता नोव्हेंबरपासून या उपक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी शहरातील 24 महाविद्यालये आणि 35 शाळांमध्ये 150 यशस्वी जागरूकता सत्रे आणि मोहिमा केल्या.  आतापर्यंत 18 महाविद्यालयांमधून 54 संघ (प्रत्येकी 10 सदस्यांसह) तयार करण्यात आले आहेत.

पवना नदीचे उगमापासून दापोडीपर्यंत 42 किलोमीटर अंतर आहे. बायोकेमिकल ऑक्सीजन डिमांड (बीओडी) आणि केमिकल ऑक्सीजन डिंमाड (सीओडी) या घटकांमुळे खालुंब्रे ते दापोडी दरम्यानचे 24 किलोमीटर नदी पात्रातील पाणी वापरण्याजोगे राहिले नाही. त्यासाठी 18 महाविद्यालयांना प्रत्येकी दोन-दोन किलोमीटर नदी पात्राची स्वच्छता, देखभाल, उपाययोजना करण्याचे दायित्व सोपविले जाणार आहे.  या महाविद्यालयातील विद्यार्थी, जलदिंडीतील तज्ज्ञांसोबत रावेतच्या पुढील 40 गावांमधील ग्रामपंचात सरपंच, ग्रामसेवक यांच्यासाठी कार्यशाळा घेणार आहेत. नदीचे पात्र दुषित होत चालले आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, कशा पद्धतीने केल्या पाहिजेत याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  10 विद्यार्थ्यांची एक अशा टीम असणार आहेत. दर 15 दिवसाला त्या भागातील नाल्याच्या आणि नदीतील पाण्याची तपासणी केली जाईल. याबरोबरच नाल्याचा उगम  कोठून  आहे, त्याला जबाबदार  कोण आहे, याचा अहवाल दर महिन्याला महापालिका, जिल्हाधिकारी, शासनाकडे सोपविण्यात येईल. पाण्याच्या चाचणीच्या निकालानुसार त्या-त्या विशिष्ट प्रकारच्या झाडांची लागवड दोन किलोमीटर परिसरात केली जाणार आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच नदीचे दुषित होण्याचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. नव्याने वाढत असलेल्या शहराच्या भागातील नदीचे पात्र स्वच्छ आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे त्या भागातील नदी पात्राची अशीच दुरावस्था होवू शकते, अशी भितीही गौरीधर, भावसार यांनी व्यक्त केली.

नदी पोलीस मार्फत नदी प्रदूषण निर्मूलन योजनेची उद्दिष्टे!
# प्रत्येक महाविद्यालयीन संघाला नदीकाठचा 2 किमीचा भाग नियुक्त केला जाईल. थोडक्यात त्या भागाचे पालकत्व देण्यात येईल.

# पॉइंट सोर्स आयडेंटिफिकेशन – लाइव्ह नाला किंवा ड्रेन आयडेंटिफिकेशन, जिओ टॅगिंग आणि स्टार्ट टू रिव्हर मीटिंग पॉईंटच्या ड्रोनद्वारे कॅप्चर केलेल्या प्रतिमा करण्यात येतील.

# नॉन-पॉइंट सोर्स आयडेंटिफिकेशन – घरगुती, औद्योगिक किंवा कृषी प्रवाह
# दर पंधरवड्याने पाणी नमुना संकलन आणि चाचणी (दर 15 दिवसांनी)
# पाणी चाचणी परिणाम विवेचन, नदीच्या जीवनाचे धोकादायक स्वरूप आणि अंदाजानुसार तीव्रता निश्चित करणे.
# पाणी नमुन्या आधारे झाडें अथवा वनस्पती लागवड प्रशिक्षण
# सोल्यूशन डिझायनिंग आणि अहवाल जिल्हा परिषद, महापालिका, राज्य आणि केंद्रीय प्राधिकरणांना सादर केला जाईल.  हितधारकांकडून अंमलबजावणी नंतर मंजुरी करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
# ग्रामीण भागात नदी स्वच्छता आणि देखभाल याविषयी शिक्षण/जागृती मोहीम

जलदिंडी प्रतिष्ठान पवनेच्या संवर्धनासाठी 20 वर्षांपासून कार्यरत!

जलदिंडी प्रतिष्ठान गेल्या 20 वर्षांपासून नदी स्वच्छतेविषयी  जनजागृतीचे काम करत आहे. जलदिंडी वर्षातून दोनदा समाजात (शाळा, महाविद्यालये आणि सामान्य जनता) नदी प्रदूषणाबाबत जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने केली जाते. कार्यक्रमाच्या दरम्यान लोकांना बोटीद्वारे नदीच्या उगमा पासून संगमा पर्यंत प्रवास घडवण्यात येतो. एक जलदिंडी आळंदी ते पंढरपूर इंद्रायणी नदीवर आणि दुसरी जलदिंडी पवना धरण ते चिंचवड पवना नदीवर अशी होते. असा प्रत्यक्ष नदीवर प्रवासाचा अनुभव त्यांना नदीच्या समस्या समजण्यास मदत होते.  पवना नदीपासून 20 किमी दूर जाताना पाण्याची गुणवत्ता कमी कमी होत जाते. नाल्यात रूपांतर होऊन संपते.  तेच पाणी पुढे पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी वाहून नेले जात आहे.  त्यामुळे त्यांना सध्याच्या नदी परिस्थितीची जाणीव या जलदिंडी मार्फत केली जाते.  “River Police ” उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी अथवा अधिक माहितीसाठी संपर्क  ओंकार गौरीधर 9372937598 आणि राजीव भावसार 9881154228 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.