Hinjawadi : एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे तीन सराईत पोलिसांच्या जाळ्यात: 6 फरार

एमपीसी न्यूज – बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन सराईतांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. तर अन्य सहा जण पळून गेले. ही घटना आज (बुधवारी) मध्यरात्री हिंजवडी येथे सुस गाव रोडला घडली.

रोहीत लक्ष्मण गायकवाड (वय 23, रा. थेरगाव), अक्षय राजेंद्र फुगे (वय 20, रा. जगताप डेअरी), आषिश कैलास कांबळे (वय 20, रा. थेरगाव) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर अक्षय साबळे, किसन कांबळे, ओंकार फडतरे, बंदर उर्फ दिपक सावंत, मंन्त्या, हम्या चंदनशिवे हे सहाजण पळून गेले आहेत. अक्षय साबळे हा कुविख्यात रावण टोळीचा सदस्य आहे. तसेच तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 13) रात्री नऊच्या सुमारास सुसगाव रोडवरील स्मशान भूमीजवळ मोकळ्या मैदानात काही तरुण संशयीत दुचाकी गाड्यांवर थांबले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्यांच्यावर पाळत ठेवली असता नऊ तरुण कोणत्यातरी गुन्ह्याची तयारी करत असल्याचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. पोलीस आल्याची चाहूल लागताच सर्वजण पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. बराच अंतर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी तिघांना पकडले. तर अन्य सहा जण पळून गेले.

ताब्यात घेतलेल्या तिघांकडे चौकशी केली असता ते बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. त्यावरून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक जिवंत काडतूस, चार कोयते, मिरची पूड, दोन दुचाकी असा एकूण 1 लाख 10 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर फरार आरोपींना पकडण्यासाठी दोन पथकांना रवाना करण्यात आले आहेत. फरार आरोपींपैकी लक्ष्मण गायकवाड याच्यावर 4 गुन्हे दाखल असून, अक्षय फुगे याच्यावर एक, आषिश कांबळे याच्यावर एक असे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस वरीष्ट पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवाजी गवारे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, पोलीस उप निरीक्षक अशोक गवारी, पोलीस हवालदार किरण पवार, बाळकृष्ण शिंदे, पोलीस नाईक विवेक गायकवाड, अतिक शेख, पोलीस शिपाई विकी कदम, सुभाष गुरव यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.