Sangavi News: सुशोभीकरणाच्या नावाखाली 90 कोटींचे नवे काम; निविदा तत्काळ रद्द करा – राहुल कलाटे

एमपीसी न्यूज – सांगवी ते किवळे या बीआरटीच्या 16 किलोमीटर मार्गावर पैशांची उधळपट्टी सुरुच आहे. 329 कोटींचा खर्च केल्यानंतर आता रस्ते सुस्थितीत असतानाही सुशोभीकरणाच्या नावाखाली 90 कोटी रुपयांचे नवीन काम काढल्याचा आरोप करत ही निविदा तत्काळ रद्द करावी, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.

कलाटे म्हणाले, सांगवी ते किवळे हा 45 मीटर रूंदीचा बीआरटी मार्ग आहे. हा प्रशस्त रस्ता असून, या मार्गावर बीआरटीचा स्वतंत्र मार्ग आहे. या रस्त्यावर गेल्या दहा वर्षांत विविध कारणांने तब्बल 328 कोटी 73 लाखांचा खर्च करण्यात आले आहेत. त्यात रस्ते, पदपथ, बीआरटी मार्ग, ग्रेडसेपरेटर कामांचा समावेश आहे. मार्ग सुस्थितीत असताना आता सुशोभीकरण, रस्ता समतल करणे व चेंबर लेव्हल करण्यासाठी सुमारे 90 कोटींचा खर्च केला जात आहे.सांगवी ते काळेवाडी फाटा मार्गाचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत करण्याचा डाव फसल्याने त्यासाठी नियमबाह्यपणे महापालिकेचे 30 कोटींचा निधी वर्ग करण्यात आला आहे. त्यास सर्वसाधारण सभेने मंजुरीही दिली आहे. स्मार्ट सिटीचे काम करणार्‍या ठेकेदाराला ते काम थेट पद्धतीने देण्यात आले.

काळेवाडी फाटा ते किवळे या मार्गावरील दोन विभागात काम करण्यासाठी एकूण 60 कोटींची निविदा 1 ऑक्टोबरला प्रसिद्ध केली. असे एकूण 90 कोटींचे काम आहे. काळेवाडी ते डांगे चौक मार्गावर अनेक ठिकाणी 45 मीटर रस्ता व पदपथ नाहीत. रावेत पुल ते किवळे मार्गावर केवळ 30 मीटरचा रस्ता आहे. त्यामुळे प्रकल्प संपूर्ण मार्गावर करता येणार नाही. निविदा प्रसिद्ध करण्यापूर्वी रस्त्याची मजबूती तपासणी अहवाल तयार न करता तक्रार केल्यानंतर ती करण्यात आली आहे. या नवीन कामात दोन्ही बाजूला प्रत्येकी 7 मीटर रूंदीचे पदपथ तयार करण्यात येणार आहे. रस्त्यामध्ये बीआरटीचा मार्ग असल्याने हा रस्ता अधिक अरूंद होऊन वाहतुक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे या कामांची निविदा रद्द करावी अशी मागणी कलाटे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.