Sangvi : तरुणीशी बोलण्याच्या वादातून दोघांवर वार

एमपीसी न्यूज – तू तरुणीशी का बोलतो, असे म्हणत तीन जणांनी मिळून दोघांना मारहाण करत त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास मधूबन सोसायटी, जुनी सांगवी येथे घडली.

महेश सुभाष जाधव (वय 19, रा. गणेशनगर, पिंपळे निलख) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अमोल भोसले, अजय सावंत, शुभम कांबळे (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुबन सोसायटी, जुनी सांगवी येथील जनाई बंगल्यासमोर फिर्यादी महेश आणि त्यांचे मित्र आदेश, किरण आणि एक तरुणी असे चौघेजण बोलत थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. आरोपी अमोल आणि शुभम यांच्या हातात कोयते तर अजय याच्या हातात बिअरची मोकळी बाटली होती.

अमोल याने फिर्यादींना ‘तू या तरुणीसोबत का बोलतो ?’ असे म्हणत फिर्यादीच्या हाताच्या पंज्यावर, खांद्यावर कोयत्याने वार केले. आरोपी अजय याने फिर्यादीचा मित्र आदेश याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. तर आरोपी शुभम याने आदेशाच्या खांद्यावर कोयत्याने मारले. यामध्ये फिर्यादी महेश आणि त्यांचा मित्र आदेश हे दोघेजण गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.