Khed News : आदिवासी मुलांच्या खास वैशिष्ट्यांनी नटलेले विज्ञान प्रदर्शन

एमपीसी न्यूज –  आदिवासी समाजातील मुलांमध्ये असलेले ज्ञान पुढे आणण्यासाठी, या ज्ञानाची शिदोरी सर्वांना मिळावी म्हणून वर्क फॉर इकव्यालिटी (Work for Equality) या सामाजिक संस्थेने विज्ञान प्रदर्शन व त्यावर आधारीत शोध – मुलांचे विज्ञान प्रकल्प हे पुस्तक मुलांच्याच भाषेत प्रकाशित केले. मुलांनी माशांची माहिती, पक्षांची नावे सांगितली. आदिवासी समाजाकडे असलेले अलिखीत ज्ञान जतन करून त्याला सन्मानित करण्याची गरज असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

खेड येथे 29 एप्रिल 2022 रोजी हे विज्ञान प्रदर्शन भरले होते. पुस्तकाचे प्रकाशन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य  शरद बुट्टे पाटील आणि गट शिक्षण अधिकारी जीवन कोकणे, शिंडलर कंपनीचे अधिकारी प्रसन्ना पोतदार, सतीश रेवाना, दिनेश कामत, विज्ञान अभ्यासक आणि प्रचारक  ज्योती हिरेमठ, निसर्गप्रेमी आणि शेती अभ्यासक आफ्रिन काळे यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

वर्क फॉर इक्युलिटी संस्थेच्या संस्थापिका प्रभा विलास म्हणाल्या, ”एरवी आदिवासी समाजातील मुले आपल्याला शिक्षणात, लिखाणात नेहमीच मागे पडलेली दिसतात. परंतु, त्यांच्याकडे त्यांच्या काही उपजत क्षमता आहेत. ज्याला पुढे आणण्याची व त्याला सन्मानीत करण्याची प्रचंड गरज आहे म्हणजे ही मुले याच ज्ञानाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर सन्मानाने उभी राहू शकतात”.

”आदिवासी मुलांमध्ये झाडे, फुले, पाने, पक्षी, जमीन, जंगल यावर आधारीत खूप ज्ञान आहे. 10 वर्षाची ऐश्वर्या त्यांच्या परिसरातील नदीत आणि विहिरींमध्ये असलेल्या किमान 15,20 वेगवेगळ्या माशांची माहिती पटापट सांगते. 10 वर्षाचा कार्तीक नुसत्या पक्षांच्या पंखावरून किमान 12, 15 पक्षांची नावे सांगू शकतो. 15 वर्षाच्या अश्विनीने तिच्याच परिसरातील 60 प्रकारच्या बिया जमा करून त्याचे जतन करण्याची सुरुवात केली आहे. 15 वर्षाचा योगेश ताजे झाडावर चढून काढलेले मधाचे पोळ तोंडाला लावून मिटक्या मारत मारत खातो आणि जंगलात कोणकोणत्या प्रकारचे मध मिळते, ते कसे काढायचे, कोणत्या प्रकारचे मध खायला चांगले अशी अचंबीत करणारी माहिती सांगतो”, असे प्रभा विलास यांनी सांगितले.

हे अलिखित ज्ञान पुढे येण्याची खूप गरज आहे. हे ज्ञान जीवन जगताना खऱ्या अर्थाने गरजेचे आहे. या ज्ञानाच्या आधारे जर या मुलांचे मूल्यमापन केले. तर, ते इतर मुलांना खूप मागे टाकतील. पण, दुर्दैवाने या ज्ञानाला आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये कुठेच स्थान दिले जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

या प्रकल्पासाठी शिंडलर कंपनीने सहकार्य केले. या कामात संस्थेचे सर्व कार्यकर्ते स्नेहल ठक्कर, श्रद्धा तेलंगे, सुरज कांबळे, रसिका गावडे, आशा शेख, प्रियांका नाईकडे, रोहिणी कोरडे यांनी मुलांसोबत प्रकल्पासाठी काम केले. तर, बसवंत विठाबाई बाबाराव या पर्यावरण अभ्यासकाचे या प्रकल्पाला मार्गदर्शन मिळाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.