Talegaon : पॅटीसमध्ये आळ्या आढळल्याने बेकरीला ‘सील’

एमपीसी न्यूज – बेकरीतून खरेदी केलेल्या पॅटीसमध्ये आळ्या आढळण्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला. बेकरीतून होत असलेली खराब पदार्थ विक्री आणि अस्वच्छतेच्या कारणास्तव लिंब फाटा – मारुती मंदीर रस्त्यावर असलेल्या भंडारी हॉस्पिटलजवळील साईदीप बेकर्स अँड स्वीट या दुकानास नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने सील ठोकले. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश धनाजी जाधव(वय 19, रा.भेगडेआळी, तळेगाव दाभाडे) यांनी या बेकरीतून सकाळी आठ पॅटीस खरेदी केले. पार्सल असलेले पॅटीस दीपेश जाधव यांनी घरी नेले. मात्र, त्यावर अळ्या व बुरशी असल्याचे नंतर त्यांच्या लक्षात आले. पॅटीस बदलून घेण्यासाठी ते बेकरीत आले. मात्र, तोपर्यंत पॅटीस आणि आळ्याची ही गंभीर बाब वाऱ्यासारखी पसरली. काही युवकांनी दुकानातील खराब सामान बाहेर फेकले.

सामाजिक कार्यकर्ते राहुल भेगडे आणि सचीन बिराजदार यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून परिस्थिती हाताळली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान, घटनास्थळी ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी भेट देऊन पाहणी केली. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे ही बाब गंभीर असून कारवाई करण्याच्या फुले यांना सूचना दिल्या.

आरोग्य विभागाचे निरीक्षक प्रमोद फुले हेही घटनास्थळी तातडीने दाखल झाले. खबरदारी म्हणून प्रमोद फुले यांनी बेकरीस सील ठोकले आहे. जप्त केलेला माल पुढील कार्यवाहीसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाकडे पाठविण्यात येणार असल्याचे फुले यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.