Pimpri : पिंपरी-चिंचवडमध्ये फेब्रुवारीत शाहिरी महोत्सवाचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चार दिवसीय भव्य शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे, अशी माहिती महाराष्ट्र शाहीर परिषद, पुणे जिल्हाध्यक्ष शाहीर प्रकाश ढवळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना शाहीर प्रकाश ढवळे म्हणाले की, पन्नास वर्षांपूर्वी स्वर्गीय शाहीर योगेश आणि स्वर्गीय शाहीर किसनराव हिंगे यांनी महाराष्ट्र शाहीर परिषदेची स्थापना केली.

शिवपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या परंतु काळाच्याओघात लोप पावत चाललेल्या शाहिरी कला अन् संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे, शाहिरी कलेचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा मूळ उद्देश परिषदेच्या स्थापनेमागे होता. यासाठी महाराष्ट्रभर विखुरलेल्या लोककलावंतांचे संघटन करून, त्यांची कला जिवंत ठेवून ती पुढील पिढीत संक्रमित करण्याचे महत्त्वाचे कार्य परिषदेने केले.

प्रामुख्याने शाहिरांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांना प्रशिक्षण देणे, शासन दरबारी शाहिरांची दखल घेतली जाऊन त्यांना पुरस्कार, मान-सन्मान आणि निवृत्तीवेतन मिळावे यासाठी पन्नास वर्षांच्या दीर्घ कालावधीत परिषदेने सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.

महाराष्ट्र शाहीर परिषदेचे विद्यमान अध्यक्ष शाहीर दादा पासलकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर शिबिरे, शाहिरी जलसे आणि महोत्सवांचे वेळोवेळी आयोजन करून बाल, युवा आणि महिला शाहिरांना घडवण्यात यश मिळवले आहे. आता परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुणे शहर, सांगली, नागपूर, जळगाव, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केलेले असून त्या महोत्सवांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरात फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या चार दिवसीय भरगच्च कार्यक्रमात बाल, युवा, महिला आणि ज्येष्ठ शाहिरांचा सहभाग राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.