Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख – 35 वा – चंद्रचूड सिंग

एमपीसी न्यूज : त्याने आपल्या चित्रपटसृष्टीतल्या करियरची सुरुवात करताना महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘एबीसीएल’ या चित्रपटसंस्थेच्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. पहिल्याच चित्रपटातून त्याने चाहत्यांसह चित्रपटसमीक्षक, सिनेपत्रकार यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर त्याने अगदी काहीच कालावधीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून आपले नाणे खणखणीत आहे, हे सिद्ध केले होते. (Shapit Gandharva) तो जितका मर्दानी पुरुष म्हणून शोभून दिसला, तितक्याच उत्तमरित्या चॉकलेट हिरो म्हणूनही शोभला. त्याने ऐश्वर्या राय बरोबर रूपेरी पडद्यावर स्क्रिन शेअर केला.अतिशय कमी कालावधीतच त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आपला खास चाहतावर्ग तयार केला. मोठमोठ्या सिनेनिर्मात्यांना, महान दिग्दर्शकांना त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या….

दुर्दैवाने त्या अपेक्षा पूर्ण करण्यात, सार्थ ठरवण्यात तो यशस्वी ठरला नाही आणि हे सत्य उमगताच उद्याचा सुपरस्टार म्हणून त्याला डोक्यावर घेणाऱ्यांनी त्याचे अपयश बघताच त्याला खड्यासारखे बाजूला टाकले. आज तर तो फक्त कट्टर चाहते सोडले तर कोणाला आठवतही नाही.

अतिशय प्रतिभावंत म्हणून ओळखला जाणारा, उद्याचा भावी सुपरस्टार म्हणून चर्चिला गेलेला देखणा नायक, उत्तम अभिनेता चंद्रचूड सिंग हा सुद्धा दैवाच्या अगाध लीलेमुळे यशस्वी ठरता-ठरता शापित गंधर्वच ठरला.

 

11 ऑक्टोबर 1968 साली अलिगढ येथे एका उच्च सुशिक्षित आणि सधन कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याचे वडील उत्तरप्रदेश मधील खैर जिल्ह्याचे आमदार होते. डेहराडून येथील विख्यात ‘डून’ कॉन्व्हेंटमध्ये त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने चित्रपटात आपले नशीब आजमावण्याआधी ‘डून’ शाळेत संगीत शिक्षक म्हणून काही काळ नोकरीही केली होती. पण त्याला चित्रपटसृष्टीतच आपले नशीब आजमावून बघायचे होते. (Shapit Gandharva) त्याला आपल्या व्यक्तिमत्त्वाची पूर्ण जाणीव होतीच. त्याचे मित्रही त्याला यासाठी वारंवार प्रोत्साहित करत होते. शेवटी मनाच्या हट्टाने विजय मिळवला आणि चंद्रचूडसिंग मायावीनगरीत प्रवेश करता झाला. त्याच दरम्यान अमिताभ बच्चनने आपली महत्वाकांक्षी अशी ‘एबीसीएल’ ही  नवीन कंपनी स्थापन केली होती. त्यांच्या बॅनरचा पहिलाच चित्रपट होता ‘तेरे मेरे सपने’. परमेश्वराच्या कृपेने असंख्य चेहऱ्यातून चंद्रचूडसिंगची नायक म्हणून निवड झाली.

या चित्रपटात त्याच्यासोबत होते अर्षद वारशी, प्रिया गील, प्राण हे सहकलाकार. या चित्रपटाने बऱ्यापैकी यश मिळवले अन् एका रात्रीत चंद्रचूड सिंग प्रसिद्धीच्या  झोतात आला. खरे तर त्याच्यापेक्षा जास्त भाव खाऊन गेला होता अर्षद वारसी. पण चंद्रचूडसिंगही त्याच्या देखण्या रूपामुळे आणि सशक्त अभिनयामुळे स्त्रीवर्गात चांगलाच लोकप्रिय झाला. त्याच्या अभिनयाने आणि आत्मविश्वासपूर्ण वावराने महान गीतकार आणि संवेदनशील दिग्दर्शक गुलजार भलतेच प्रभावित झाले आणि त्यांनी त्याला आपल्या ‘माचीस’ या चित्रपटासाठी त्याला करारबद्ध करून त्याच्या प्रतिभेवर जणू शिक्कामोर्तबच केले. हा चित्रपटही चांगलाच यशस्वी ठरला.

या चित्रपटाने त्याला पदार्पणातच सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. स्वप्नवत कामगिरी ज्याला म्हणतात ती याहून काय वेगळी असते हो? बघता-बघता चंद्रचूड सिंग यशाच्या शिखराजवळ आला. यानंतर त्याचा ‘दाग द फायर’ हा सोलो नायक असलेला चित्रपट आला, ज्याने सुद्धा बऱ्यापैकी यश मिळवले. याचसोबत आला त्याचा ‘जोश’ नावाचा चित्रपट ज्यात तो चक्क ऐश्वर्या रायचा नायक होता. (Shapit Gandharva) एकापेक्षा एक सुंदर गीते, गोव्यातले मनोहर लोकेशन्सवरचे शूटिंग, तरुणाईला आवडणारे कथानक यामुळे हा चित्रपटही बऱ्यापैकी यशस्वी ठरला, पण याचे बरेचशे श्रेय शाहरुख खान आणि ऐश्वर्या रायला दिले गेले. पण यातल्या चंद्रचूड़च्या अभिनयाचीही दखल सर्वांनी घेतली. तो यशाचे एकेक टप्पे पार करत आता शिखरावर चढणारच होता की त्याच्या आयुष्यात तो भयंकर अपघात घडला. कुठल्यातरी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्याला खांद्याच्या विकाराला तोंड द्यावे लागले. तो विकार जीवघेणा नसला तरी त्याला सक्तीची विश्रांती घ्यायला लावणारा होता.

यावेळी उपचार चालू असतानाची औषधे त्याला उपयोगी कमी आणि त्रासदायकच जास्त ठरली. या औषधांचा साईड इफेक्ट झाल्याने त्याचे वजन कमालीचे वाढले. त्याला त्या आजारामुळे व्यायाम करण्यातही खूप त्रास व्हायचा. परिणामी त्याचे वजन आणखी वाढत गेले, ज्यामुळे त्याला बरेचसे चित्रपट सोडावे लागले. जाडजूड हिरो आपल्या हिंदी सिनेसृष्टीत कसा चालेल? झाले! त्यावर ‘जाड्या’ असाच जणू शिक्का बसला आणि बघता-बघता तो लोकांच्या नजरेआड गेला. इथल्या शिरस्त्याला सार्थ जागत कोणीही त्याची ना विचारपूस केली ना कोणी दखल घेतली. त्यातच हा आपले अस्तित्व दाखवण्यातही अपयशी ठरला आणि हळूहळू मग विस्मृतीत गेला. अगदीच नाही म्हणायला त्याला काही चित्रपट मिळालेही. जसे आमदनी अठन्नी- खर्चा रुपय्या, क्या कहना, चार दिन की चांदनी, श्याम-घनश्याम, दिल क्या करे, इ. पण हे चित्रपट त्याला विशेष यश मिळवून देऊ शकले नाहीत आणि मग खऱ्या अर्थाने हा देखणा नायक या मायावीनगरीला नकोसा झाला.

प्रचंड प्रतिभावंत, तितकाच देखणा आणि असली मर्द वाटणारा चंद्रचूड सिंग खरे तर आज सुपरस्टार म्हणून मिरवणाऱ्यांपेक्षा कितीतरी पटीने अधिक लायक होता. पण हे जरी आपल्याला (Shapit Gandharva) वाटत असले, तरी त्या वरच्याला मात्र असे वाटत नव्हते. म्हणूनच त्याने त्याला चार दिन का हिरो बनवले आणि नंतर त्याला बेदखल करून आपली मर्जी हीच सर्वश्रेष्ठ आहे असेच सिद्ध केले. यावर ना आपल्याला कुठे तक्रार दाखल करता येते ना दाद मागता येते. आपण फक्त त्याची इच्छा असे म्हणायचे आणि बाकी सगळे सुस्कारे सोडत सोडून द्यायचे असते,बरोबर ना?

पण आता तरी त्या परमेश्वराने आपल्या हातून झालेली चूक सुधारावी आणि खास चंद्रचूड सिंगच्या प्रतिभेचा सन्मान वाढवतील असे सिनेमे बनवावेत, मग ते नायक म्हणूनच हवेत असे थोडेच असावे? वयाच्या 54 व्या वर्षांनंतर चित्रपटसृष्टीत आलेल्या बोमन इराणीने कुठल्या चित्रपटात नायकाचा रोल निभावला? पण तो आजही नायकाइतकाच यशस्वी आणि कमाई करणारा आहेच की. याचे कारण हेच की त्याला तशा अविस्मरणीय भूमिकाही मिळाल्या. परमेश्वराने चंद्रचूडलाही आता त्याच्या वयाला साजेसे पण सशक्त काम देऊन त्याच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन करावे. मी तरी त्यासाठी मनापासून प्रार्थना करणार आहे. तुम्हीही कराल का? कराच. असे म्हणतात दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेल्या प्रार्थनेत खरोखरच खूप ताकत असते.

चंद्रचूड सिंग यापुढेही एक उत्तम आणि यशस्वी अभिनेता असो, हीच ‘त्याच्याकडे’ प्रार्थना!

विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.