Shapith Gandharva Part 6 : शापित गंधर्व – भाग सहावा – राजू श्रीवास्तव

एमपीसी न्यूज : त्याला लहानपणापासूनच (Shapith Gandharva Part 6) इतरांच्या नकला करायची खूप आवड होती. तो इतक्या सुंदर नकला करायचा, की त्याने ज्यांच्या नकला केल्यात, त्यांनाही त्याचा राग न येता आनंदच व्हायचा. महानायक अमिताभ बच्चन या जगात कोणाला आवडत नाही? यालाही तो खूप म्हणजे खूपच आवडायचा. इतका की ध्यानी- मनी- स्वप्नी सर्वत्र तोच. या आवडीपायीच त्याने अमिताभच्या प्रत्येक गोष्टीचा इतक्या बारकाईने अभ्यास केला, की त्याला अमिताभच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करता येऊ लागली. तो इतकी अस्सल अमिताभची नक्कल करत असे, की त्याला ‘कानपूरचा अमिताभ’ म्हणून ओळखण्यात येऊ लागले.

यातूनच त्याने मायानगरी मुंबईत पाऊल ठेवले. कधी? वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी. इथे आल्या-आल्या त्याला स्वप्न आणि सत्य यातली जाणीव झाली. स्वप्न जितके सुंदर; सत्य तितकेच जहाल आणि कटू. पण, त्याने स्वप्न सत्यात आणण्यासाठी पडेल ते काम केले. संघर्ष त्याने दैवत मानले आणि मिळणारी संधी त्या देवाचा आशीर्वाद. प्रचंड कष्ट केले आणि त्याने कधी तरी हूड वयात पाहिलेल्या बेलगाम स्वप्नांना सत्यात उतरवून आपले नाणे एकदम खणखणीत वाजवले. आता त्याच्याकडे पैसा, मानमरातब, मालमत्ता सर्व काही होते. ज्या महानायक अमिताभच्या नकला करून तो इथवर आला, त्या महानायक अमिताभ बच्चनलाही त्याने आपले दिवाने बनवले.

आता स्वप्न उरले नव्हते. ते एक तेजस्वी सत्य झाले (Shapith Gandharva Part 6) होते. ‘सब कुछ जोर में’ अशी परिस्थिती झाली होती. त्यांना समाजवादी पक्षाने 2014 साली कानपूर लोकसभा निवडणूक लढवावी म्हणून तिकीट सुद्धा दिले होते; मात्र आठच दिवसांनी त्यांनी मला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही,असे सांगत निवडणूक लढवायला विनम्रपणे नकार दिला होता. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने ‘स्वच्छ भारत’ या आपल्या लोकप्रिय मोहिमेसाठी त्यांना ‘ब्रँड अँबॅसिडर’ म्हणून घेतले होते.

प्रचंड लोकप्रियता त्यांनी मिळवली होती. त्याच्या आनंदाला, समाधानाला पारावर उरला नव्हता. एव्हढयातच परमेश्वराची मर्जी खपा झाली आणि त्याच्याशी त्या सर्वसाक्षी परमेश्वराने खेळ करत त्याला एक झटका दिला, जो इतका तीव्र होता की त्याला काहीही करता आले नाही. महिनाभर त्याने झुंज दिली; पण यावेळी त्याचा प्रतिस्पर्धी कोणी साधासुधा नव्हता. त्याने याच्या सर्व प्रतिकाराला मोडीत काढले आणि त्याचा अध्याय बंद करून त्याला आपल्याकडे बोलावूनच घेतले.

होय! मागच्याच आठवड्यात त्याचे वयाच्या फक्त 59 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्या शापित गंधर्वाचे नाव आहे ‘सत्यप्रकाश’ उर्फ ‘गजोधर भैय्या’ उर्फ ‘कानपूरचा अमिताभ’ उर्फ सर्वांचा लाडका आणि सर्वाना पोटभरून आणि पोट धरूनही हसायला लावणारा प्रसिद्ध अभिनेता विनोदवीर म्हणजे ‘राजू श्रीवास्तव’. त्याला मागच्या महिन्यात जीममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा त्रास झाला, त्यामुळे त्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साधारण महिनाभर त्याने मृत्यूशी झुंज दिली; पण त्याची लढाई काही यशस्वी ठरली नाही. अखेर 21 सप्टेंबर 2022 रोजी त्याची प्राणज्योत मावळली. मागील काही वर्षे सातत्याने संपूर्ण देशाला हास्यरसाने खळखळून हासवणाऱ्या या गजोधरने जाताना मात्र सर्वांना रडवूनच आपल्या चाहत्यांना अखेरचा गुडबाय केला.

25 डिसेंबर 1963 रोजी त्याचा जन्म कानपूर (Shapith Gandharva Part 6 ) येथे झाला. त्याचे वडील रमेशजी श्रीवास्तव हे एक प्रसिद्ध कवी होते. कानपूरमध्ये त्यांना ‘बलाईकाका’ म्हणून ओळखले जात असे. साहजिकच वडिलांची प्रतिभा राजू यांच्यात उतरणे स्वाभाविकच होते. राजू श्रीवास्तव बालपणापासूनच दिलखुलास वृत्तीचे होते.आपल्या आसपासच्या लोकांचे बारकाईने निरीक्षण करून ते आपल्या मित्रमंडळींसमोर त्यांच्या हुबेहूब नकला करून दाखवत असत. यातूनच त्याचा हा छंद अधिकाधिक वृद्धिंगत होत गेला. हळूहळू त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या आवाजावर खूप मेहनत घेत तो आत्मसात केला आणि त्यावर त्यांनी इतके प्रभुत्व मिळवले की ते नाहीत, तर स्वतः अमिताभजीच बोलत आहेत, असे वाटत असे.

यामुळे त्यांच्या एका मित्राने त्यांना अमिताभच्या आवाजातल्या काही नकलांच्या संवादाच्या ऑडिओ कॅसेट्स काढायचा सल्ला दिला. राजू श्रीवास्तव यांनाही तो पटला आणि त्यांनी सर्व ते कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून तसा अल्बम काढला, ज्याला विक्रमी प्रतिसाद मिळाला. हळूहळू त्या अल्बमला कानपूरबाहेरूनही मागणी येऊ लागली आणि ‘राजू श्रीवास्तव’ या नावाची बऱ्यापैकी ओळख निर्माण झाली. यातूनच त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी मायानगरीत आपले पाऊल टाकले. त्यांनी त्यांच्या मेहुण्याची मावस बहीण शिखासोबत विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांचे चौकोनी कुटुंब अतिशय आंनदी होते.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी राजू श्रीवास्तव मुंबईत आले. मात्र, इथे आल्यानंतरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. प्रचंड कष्ट, अपमान, दुःख झेलत त्यांनी मिळतील त्या भूमिका करत आपले बस्तान मुंबईनगरीत बसवायला सुरुवात केली. ‘तेजाब’ या सुपरहिट चित्रपटातून त्यांनी किरकोळ भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर मैने प्यार किया, बाजीगर, मैं प्रेम की दिवानी हूँ, अभय, मिस्टर आझाद अशा चित्रपटांतून काम करत आमदनी वाढवण्यासाठी प्रयत्न केले, जे बऱ्यापैकी यशस्वी ठरले. यातून पोटापाण्याची सोय होत होती, मात्र खास अशी ओळख काही निर्माण होत नव्हती. आणि याच दरम्यान 1997 साली छोट्या पडद्यावर अनेक खासगी चॅनेल्स सुरू झाले होते. त्यातलेच एक होते स्टार वन. शेखर सुमन आणि नवज्योतसिंग सिद्धू जज असलेल्या एका ‘द लाफ्टर चॅलेंज शो’ नावाचा स्टॅण्डअप कॉमेडीचा एक शो आला, ज्यात अनेक विनोदवीर होते. भारत आणि पाकिस्तानचे सुद्धा. त्यातलेच एक होते राजू श्रीवास्तव.

इथूनच त्यांनी आपले नाव, आपल्या नावाचा शिक्का जमवायला सुरुवात केली. त्यांनी ‘गजोधर’ नावाचे एक काल्पनिक पात्र उभे केले. बिहारी, भोजपुरी आणि उत्तर प्रदेश मधली स्थानिक बोलीभाषा अचूक वापरत त्यांनी हे पात्र इतके जिवंत केले, की लोक त्यांना राजू श्रीवास्तव ऐवजी ‘गजोधरभैय्या’ म्हणूनच ओळखू लागले. ‘मज़ाक मज़ाक में कितने लोग जमा हो गये!’ हा त्यांचा संवाद खूप लोकप्रिय झाला. लालू प्रसाद, अमिताभ यांच्या नकला करत त्यांनी आपल्या नावाची खास ओळख निर्माण केली. बघता-बघता ‘कानपूरचा अमिताभ’ ही ओळख बदलून ‘कॉमेडी सुपरस्टार राजू श्रीवास्तव’ ही हवी-हवीशी वाटणारी ओळख निर्माण झाली.

यानंतर त्यांच्याकडे नाव, पैसा, मान-मरातब हे सर्व काही चालत आले. त्यांचे असंख्य दौरे सुरू झाले. कधी देशात, कधी परदेशात. इतकी वर्षे केलेल्या कष्टाचे फळ आता मिळायला लागले होते. पण तेवढ्यातच त्या सुखाला दृष्ट लागली. रोजच्याप्रमाणे नित्यनेमाने जीममध्ये व्यायाम करत असताना त्यांना हृदयविकाराचा एक झटका आला, त्यातून ते अखेर सावरलेच नाहीत. संपूर्ण देशभरातून त्यांचे चाहते (Shapith Gandharva Part 6) परमेश्वराकडे त्यांच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करत होते; पण कशालाही यश आले नाही आणि अखेर 21 सप्टेंबर 2022 रोजी जगाला हास्यानंद देणारा हा विनोदवीर इहलोकीचा निरोप घेऊन वयाच्या अवघ्या 59 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड निघून गेला.

जगाला हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या हृदयात म्हणे एक- दोन नाही, तर असंख्य ब्लॉकेजेस होते. बाहेरून इतका सुखी, आनंदी आणि दिलखुलास वाटणारा हा माणूस नक्की कुठल्या स्ट्रेसमध्ये होता बरे? मग ते सदैव ओठी असणारे हास्य वरवरचेच होते का? असंख्य चाहत्यांना निव्वळ आनंद देणारा हा हास्यदूत स्वतःला आनंदी का ठेवू शकला नाही? की सर्व काही कळत असूनही, शरीराने दिलेला कॉल ऐकूनही त्याकडे पैसा, नाव कमवण्यासाठी दुर्लक्ष केले का? असंख्य प्रश्न डोक्याचा भुंगा करत आहेत. उत्तरं मिळत नाहीत. मिळाली तर पटत नाहीत. मग मन म्हणते हाच तर दैवी खेळ आहे, जो कोणालाही कधीही कळलेला नाही.

Raju Srivastava

कारण काहीही असो. इतके कष्ट करून आता कुठे त्याचे फळ मिळत होते. हेच सत्य असताना राजू श्रीवास्तव निघून गेलेत, यासम दुसरे काहीही सत्य नाही. राजू श्रीवास्तव यांच्यासारख्या आनंदी आणि दिलखुलास माणसाची गरज कदाचित देवालाही वाटली असेल किंवा तिथेही एखादा नवा स्टॅण्डअप कॉमेडी शो असेल, ज्यात सहभागी होण्यासाठी त्यांना देवाने बोलावले असेल. ‘अरे, यहाँ तो रंभाजी, उर्वशीजी सब हैं। हम तो खामख्वाह नीचे ढूँढ़ते रहे। है ना गजोधर?’ असे म्हणत त्यांनी तिथेही सगळ्यांच्या हृदयात स्थान मिळवायला सुरुवात केली असेल. राजू श्रीवास्तव उर्फ गजोधर भैय्याच्या आत्म्याला चिरशांती आणि सद्गती लाभो, हीच परमेश्वराकडे प्रार्थना!

– विवेक कुलकर्णी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.