Pimpri : शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांची बैठक घेण्याची विनंती

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षांपासून पाणी कपात असून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यापुढेही पाणीकपात कायम राहणार आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेली गावे, शहरातील वाढते नागरीकरण, लोकसंख्या लक्षात घेता शहरातील पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. भविष्यात पाणीबाणी होण्याची शक्यता नाकारता येत नसून त्याचे परिणाम आमागी महापालिका निवडणुकीत होऊ शकतो. रखडलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आंद्रा-भामा आसखेड प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी बाधित शेतकरी, अधिका-यांची बैठक घ्यावी. तत्काळ कामे मार्गी लावण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात गजानन चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षांपासून पाणी कपात असून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे देखील पाणीकपात कायम राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  धरणात मागील वर्षापेक्षा मुबलक पाणीसाठा असूनही नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेली गावे, वाढते नागरीकरण, लोकसंख्या लक्षात घेता पाणी प्रश्न गंभीर झाला आहे. भविष्यात त्याचा उद्रेक होऊ शकतो. त्याचे परिणाम आगामी महापालिका निवडणुकीत देखील होऊ शकतात.

महापालिकेचे पवना बंद जलवाहीनीचे काम 9 ऑगस्ट 2011 पासून म्हणजेच तब्बल नऊ वर्षांपासून बंद आहे. भामा-आसखेड, आंद्रा धरणातील पाणी आरक्षणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचा ढिसाळ, नियोजनशून्य कारभार, दप्तर दिरंगाईमुळे ही कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे शहरवासीयांना पाणी कपातीचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेची चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना अकार्यक्षम ठेकेदार आणि ठेकेदारांचे हित जोपासण्याच्या धोरणामुळे अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत. अशा वेळी शहरवासीयांची राज्य शासनाने पाणी प्रश्नाबाबत दखल घ्यावी अशी अपेक्षा आहे.

त्यासाठी धरण क्षेत्रातील बाधित शेतकरी, लोकप्रतिनिधी, राज्य शासनाचे संबंधित विभागाचे अधिकारी यांची एकत्रित बैठक घ्यावी. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी  प्रकल्पाचा नियोजनबद्ध कालावधी निश्चित करावा. निर्धारित कालावधीतच ही कामे पूर्ण करण्याचे आदेश राज्य सरकारकडून महापालिकेला द्यावेत. याबाबत तत्काळ सर्व संबंधित विभागांची  बैठक घेण्याची विनंती जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.