Pune : शिवापूर टोलनाका कृती समितीतर्फे रविवारी धरणे आंदोलन

एमपीसी न्यूज – शिवापूर टोलनाका हटाव कृती समितर्फे 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वा. सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार भिमराव तापकीर, संग्राम थोपटे यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी टोलचे अभ्यास प्रमुख संजय शिरोळकर, सभागृह नेते धीरज घाटे, निमंत्रक ज्ञानेश्वर दारवटकर, मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक सुशील मेंगडे, विशाल तांबे, माजी नगरसेवक पिंटू धावडे यावेळी उपस्थित होते.

हे आंदोलन शेवटचे असेल. नागरिकांना या दिवशी मोफत सोडणार आहोत. शनिवारी – रविवारी वाहतूक कोंडी सुटत नाही. तासनतास वाहतूक कोंडीत अडकले जातात. आता न्याय मिळाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे ज्ञानेश्वर दारवटकर यांनी सांगितले.

हा टोलनाका भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे. ही टोलवसुली काम अपूर्ण असल्यामुळे 1 जानेवारी 2014 पासून बंद व्हायला हवी होती. मात्र, ती सुरू ठेवून गेल्या 9 वर्षांत तब्बल 1780 कोटी रुपयांची लुबाडणूक जनतेकडून ठेकेदाराने केली आहे. मार्च 2013 पर्यंत या रस्त्याला 6 पदरी करण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण, 2020 उजाडल्या नंतरही हे काम प्रलंबित आहे. या सर्व प्रकरणात सीबीआयकडे 100 पाणी फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती संजय शिरोळकर यांनी दिली.

धीरज घाटे म्हणाले, सामान्य पुणेकरांना या टोलनाक्याचा त्रास होत आहे. या भागात विविध तीर्थक्षेत्र आहेत. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्व पक्षाच्या प्रमुख मंडळींना घेऊन नितीन गडकरी यांची भेट घेऊन भावना पोहोचविणार आहे.

विशाल तांबे म्हणाले, पुरंदर, हवेली, भोर तालुक्यातील नागरिकां सोबतच पुणेकरांनाही या टोलनाक्याचा त्रास होतोय. हा टोलनाका हटविणे काळाची गरज आहे. या आंदोलनाला यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.