Pimpri: दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा आंदोलन करणार – महापौर जाधव यांचा इशारा

एमपीसी न्यूज – पवना धरण 100 टक्के भरले असूनही शहरवासियांना विस्कळीत पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पाणीपुरवठ्याबाबत वारंवार बैठका घेऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना केल्या. तरीही, पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा आपल्यासह सर्व नगरसेवक आंदोलन करतील,  असा थेट इशारा महापौर राहुल जाधव यांनी दिला प्रशासनाला दिला आहे. अधिका-यांवर जबाबदारी निश्चित करुन कामचुकार अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच हा अंतिम इशारा असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता विस्कळीत पाणीपुरठ्यायावरून सत्ताधारीच आंदोलन करणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरठ्यावर तोडगा काढण्यासाठी आज (बुधवारी)पल्बंर, प्रभागातील कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंत्याची  बैठक झाली. महापौर राहुल जाधव, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

बैठकीची माहिती देताना महापौर जाधव म्हणाले, ‘शहराच्या सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सनासुदीच्या काळात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठा सुरळित करण्याबाबत वारंवार अधिका-यांना उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. तरी देखील  पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धरणातून पाणी मुबलक मिळत आहे. केवळ वाटप करण्याचे नियोजन केले जात नाही’.

त्यामुळे येत्या दोन दिवसात संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा  आपल्यासह सर्व नगरसेवक आंदोलन करतील. तसेच विस्कळीत आणि अपु-या पाणी पुरवठ्यास जबाबदार असणा-या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली जाणार आहे. शहरवासिय आमच्यावर भडकत आहेत. त्यामुळे आम्ही अधिका-यांवर भडकत असून अधिका-यांकडून  उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे आमच्यावर आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही’, असेही ते म्हणाले.

एकनाथ पवार म्हणाले, ‘धरणातून दररोज 480 एमएलडी पाणी उचलले जाते. त्यामध्ये 35 टक्के पाणी गळती होत आहे. पाणी गळती रोखली पाहिजे. धरणातून उचललेले पाण्याचे व्यवस्थित वाटप केल्यास अडचण येणार नाही. पाणी सोडण्यात हलगर्जीपणा होत आहे. पाणी वाटपातील दोषी अधिका-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. अधिका-यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.