Pimpri – आशा भोसले यांच्या पुरस्काराने साक्षात सरस्वतीचे दर्शन – उदित नारायण

एमपीसी न्यूज –  आशा भोसले पुरस्काराने सन्मानित झाल्यावर मला साक्षात सरस्वीतचे दर्शन झाल्यासारखे वाटत आहे. आशा भोसले यांचे व्यक्तिमत्त्व विविधांगी आहे.  आशा दिदींबद्दल बोलणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखविण्यासारखे आहे. आशा भोसले पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मला मोठा आनंद झाला आहे, अशी भावना ज्येष्ठ पार्श्वगायक पद्मभूषण उदित नारायण यांनी व्यक्त केली. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे सिद्धी विनायक ग्रुप पुरस्कृत भारतीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आशा भोसले पुरस्काराने उदित नारायण यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील आणि ज्येष्ठ संगीतकार पंडीत ह्दयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.  पुरस्काराचे स्वरुप एक लाख अकरा हजार रुपये रोख, शाल व सन्मान चिन्ह असे आहे.

पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजूशेठ सांकला, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा वैशाली काळभोर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, विशाल काळभोर, हर्षवर्धन भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ संगीतकार पंडीत ह्दयनाथ मंगेशकर म्हणाले की, दरवर्षी मी पिंपरी-चिंचवडमध्ये येतो, इथे आलो तर राजकारण विरहित कार्यक्रम पाहायला मिळतो. भाऊसाहेब भोईर यांनी शहराला सांस्कृतिक ओळख करून देण्यासाठी १६ वर्षे अविरत कार्य करत आहेत. जे पुणेकर करू शकत नाहीत ते भोईर करतात. ते सांस्कृतिक मंत्री व्हायला हवेत. नक्कीच कलाकारांचे भले होईल. १६ वर्षात अनेक दिग्गजांना पुरस्कार दिलेत. उदित नारायण यांना दिला जाणारा पुरस्कार अत्यंत योग्य असल्याचे लतादिदींनी मला सांगितले. गाण्याला आवाज मिळायला नशीब लागते. कष्टातून गरिबीतून उदित नारायण यांना फिल्म इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले की, गेली २२ वर्षे नाट्य परिषदेचे काम करतो. सलग १६ वर्षे आशा भोसले पुरस्कार देण्याचे कार्य कायम ठेवले आहे. पुरस्काराचे यंदाचे सोळावे वर्ष असून हा पुरस्कार स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, संगीतकार खय्याम, रविंद्र जैन, बाप्पी लहरी, प्यारेलालजी, आनंदजी, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, गायक अनु मलिक, शंकर महादेवन, शास्त्रीय गायक पंडित शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौव्हाण यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध गायक पद्मभूषण उदीत नारायण यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवडला सांस्कृतिक वारसा जपता आला आहे. या कार्यक्रमामुळे नक्कीच शहराच्या नावलौकिकात भर पडला आहे त्याचा अभिमान आहे.

उदित नारायण यांनी जिंकली रसिकांची मने

उदित नारायण यांनी कार्यक्रमापूर्वी रसिकांच्या फर्माईश पूर्ण करत पापा कहते है  व पहेला नशा अशी गाणी म्हणत रसिकांना जिंकले. तर अबोलशी बोल ना ग, तु बोल ना, आशा भोसले यांचे  मधुबन मे भले कान्हा किसीको फिरसे मिले गाणी म्हणत रसिकांची मने जिंकली.  उदित नारायण आले आणि त्यांनी त्यांच्या आवाजाने रसिकांना जिंकले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.