Pune : महाराष्ट्राचा हेगिस्ते यादवच्या आव्हानासाठी सज्ज स्नेहा

पूर्णाच्या कामगिरीकडेही असणार सा-यांचे लक्ष

एमपीसी न्यूज – खेलो इंडिया युथ गेम्समधील अथलेटिक्स स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत आंध्र प्रदेशचा भरत यादव आणि महाराष्ट्राचा करण हेगिस्ते यांच्यात मोठी स्पर्धा बघायला मिळू शकते.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समधील अथलेटिक्स स्टेडियममध्ये या स्पर्धेला सुरुवात होईल. त्या वेळी सर्वांचे लक्ष असेल ते 17 वर्षांखालील गटाच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक कोण पटकावते, त्यावर. भरत म्हणाला, रांचीत झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत मला सहभागी होता आले नव्हते. त्या वेळी मला दुखापत झाली होती. आता पुण्यातील स्पर्धेसाठी माझी जय्यत तयारी झाली आहे. गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेममध्ये 100 मीटर धावण्याच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत भरतकडून चुकीची सुरुवात झाली होती. यामुळे तो अपात्र ठरला होता. त्या वेळी तो खूपच निराश झाला होता. ही निराशा मागे ठेवून तो नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. तो म्हणाला, 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत मी कधीच सहभागी झालेलो नाही. या वेळी ही शर्यत जिंकण्याचा माझा निर्धार आहे.

याच प्रकारात 21 वर्षांखालील गटात स्पर्धा असेल ती निसार अहमद, राहुल शर्मा (उत्तर प्रदेश), अभिनव चलांगोडे (केरळ) यांच्यात. ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेतील विजेता निसारला या शर्यतीत फेव्हरिट मानले जात आहे.

यानंतर हातोडा फेकमध्ये साताराची खेळाडू सुवर्णयशासाठी सज्ज झाली आहे. यात आघाडीवर आहे ती स्नेहा यादव. तिने गेल्या वर्षी ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. 19 वर्षीय स्नेहा जाधव ही साता-यातील हजरमाजी या छोट्या गावातून आलेली खेळाडू आहे. तिने 2016 च्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचबरोबर बँकॉक येथे झालेल्या युथ एशियन गेम्सचाही तिला अनुभव आहे. मुंबईची पूर्णा राओराणे हिच्याशी तिला चांगली स्पर्धा करावी लागू शकते. रांचीत झालेल्या ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत पूर्णानेही सुवर्णयश मिळवले आहे. पूर्णाने रांचीत झालेल्या स्पर्धेत 15.30 मीटर हातोडा फेक केली होती. या कामगिरीची पूनरावृत्ती करण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे पूर्णाने सांगितले. पूर्णा ही बारावीत शिकते. तुर्कीत झालेल्या वर्ल्ड स्कूल गेम्समध्ये पूर्णा चौथ्या स्थानावर राहिली होती.

या प्रकारात 29 राज्यातील 600 खेळाडू सहभागी झाले आहेत. यात सात केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश आहे. 400 मीटर शर्यतीत दोन वेळा एशियन ज्युनियर चॅम्पियन राहिलेला जिस्ना मॅथ्यूज (केरळ), उत्तराखंडचा अनूकुमार आणि महाराष्ट्राची ताइ बाम्हणे यांच्याकडूनही अधिक अपेक्षा आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.