Sports News : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांची निवड

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट संघाचा वेस्ट इंडिज दौरा (Sports News) हा 12 जुलैपासून डॉमिनिकामध्ये सुरु होणार. यशस्वी जैसवाल, ऋतुराज गायकवाड आणि मुकेश कुमार यांची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली असून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आले आहे. प्रमुख खेळाडूंपैकी एक मोहम्मद शमी याला सुद्धा विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचे संघात पुनरागमन झाले आहे, तर उमेश यादवला वगळण्यात आले आहे.

35 वर्षीय पुजाराने जूनच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात केवळ 14 आणि 27 धावा केल्यामुळे त्याला या मालिकेतून वगळण्यात आल्याचा संशय क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे व त्यामुळे या मालिकेसाठी भारताकडे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करायला नवीन खेळाडू असेल. जोपर्यंत भारत शुभमन गिलला क्रमांक 3 वर फलंदाजी देत नाही, तोपर्यंत 2023-2025 डब्ल्यूटीसी सायकलमधील भारताच्या पहिल्या मालिकेसाठी पुजाराचे स्थान जैसवाल किंवा गायकवाड याना दिले जाऊ शकते.

ओव्हलवर भारताचा सर्वाधिक धावा करणारा अजिंक्य रहाणे याने कसोटी संघातून 15 महिन्यांच्या अनुपस्थितीनंतर डब्ल्यूटीसीमध्ये पुनरागमन करून आपले स्थान कायम ठेवले आहे तर त्याला उपकर्णधारपदही देण्यात आले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील डब्ल्यूटीसी फायनलसाठी निवडलेल्या बहुतांश खेळाडूंचा (Sports News) समावेश आहे.

तेच नव्हे तर सैनीने 2021 मध्ये गब्बा येथील प्रसिद्ध विजयानंतर एकही कसोटी खेळलेली नाही. जैसवालने मुकेश सोबत स्टँडबाय खेळाडू म्हणून लंडनचा दौरा केला. गायकवाड सुद्धा या यादीत सहभागी होता. परंतु, त्याने स्वतःच्या विवाह सोहळ्यासाठी माघार घेतली होती. जैस्वाल आणि मुकेश यांचे अजून भारतीय संघामध्ये पदार्पण झालेले नाही, तर ऋतुराज ह्याने दहा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.

घरेलू सामन्यांमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या गायकवाडची 28 सामन्यांमध्ये सहा शतकांसह 42.19 ची सरासरी आहे आणि त्याच्या कौशल्याने निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले आणि त्यामुळेच त्याला या दौऱ्यासाठी संधी मिळाली आहे. यशस्वी जैसवाल याची सुद्धा मुंबईकडून खेळताना 80.21 सरासरी आहे, तर मुकेशनेसुद्धा बंगालकडून गोलंदाजी करताना उत्तम कामगिरी केली आहे.

जसप्रीत बुमराह, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे सर्व अजूनही वेगवेगळ्या दुखापतींमुळे केलेल्या शस्त्रक्रियेतून बरे होत आहेत, तर गेल्या डिसेंबरमध्ये कार अपघातात वाचल्यानंतर रिषभ पंत हा अद्याप बरा झालेला नाही. रिषभ पंतच्या अनुपस्थितीमुळे केएस भरत आणि इशान किशन यांची दौऱ्यासाठी भारताचे यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर, अक्षर पटेल, आर अश्विन आणि रवींद्र जडेजाला यांना निवडण्यात आले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यापासून प्रत्येक कसोटी संघाचा भाग असलेल्या जयदेव उनाडकटलाही कायम ठेवण्यात आले आहे, तर वेगवान गोलंदाजीमध्ये मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी आणि मुकेश यांचा समावेश आहे.

भारतीय कसोटी संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, केएस भरत, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट , इशान किशन, नवदीप सैनी.

Pune : हॉकीमध्ये यजमान एसएनबीपीला दुहेरी मुकुट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.