Pimpri : ऑलिंपियन्सच्या खेळाने शहारले ध्यानचंद मैदान 

एमपीसी न्यूज – माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या उपस्थितीने रविवारी पिंपरी-चिंचवडमधील नेहरूनगर येथील मेजर ध्यानचंद मैदान शहारून गेले. ऑलिंपिक दिवस साजरा करण्याच्या निमित्ताने आयोजित ऑलिंपियन विरुद्ध महाराष्ट्र इलेव्हन या सामन्याने ही अनुभती सर्वांनाच दिली.

पुरुष आणि महिला अशा संमिश्र खेळाडूंसह हा सामना खेळविला गेला. चारवेळचा ऑलिंपियन धनराज शहासह आठ अन्य माजी ऑलिंपियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या संघाने महाराष्ट्र इलेव्हन संघावर 3-2 असा विजय मिळविला. या सामन्याच्या निमित्ताने हॉकीचे जादूगर ध्यानचंद यांच्या नावाने असलेले मैदान खूप काळाने हॉकीमय झाले होते. कुठलीही स्पर्धा नसल्याने हॉकीचा निखळ आनंद या सामन्यात घेतला गेला. ज्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव गाजवले त्या खेळाडूंचा खेळ थेट बघण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आनंद उपस्थित प्रेक्षकांना झाला होता. घरच्या मैदानावर आपल्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांसमोर खेळताना खेळाडू देखील हरखून गेले होते.

वयाच्या पन्नाशीतही आपण स्टार असल्याचे धनराजने दाखवून दिले. महंमग रियाज, (1992, 2000 ऑलिंपिक), अजित लाक्रा (1992 ऑलिंपिक), राहुल सिंग (1996), समीर दाड (2000), विक्रम पिल्ले (2004) अशा स्टार खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. धनराजच्या ऑलिंपियन संघात तुषार खांडेकर (2012) याच्यासह रेणुका यादव, प्रीती दुबे (2016) या महिला खेळाडूंचा देखील समावेश होता. महाराष्ट्र इलेव्हन संघात मात्र राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेल्या पुरुष, महिला खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना खेळताना हॉकी अभ्यासाचे प्रात्यक्षिक केल्याचा अनुभव आला.

“वाढत्या वयांत वेगवान मैदानावर अधिक धोका न पत्करता व्यावसायिक खेळ दाखवणे पसंत केले,’अशी प्रतिक्रिया राहुल सिंग याने व्यक्त केली.
“मी या सामन्यात खेळलो नाही, पण एकाच मैदानावर इतके सारे माजी ऑलिंपियन्सना खेळताना पाहून भारावून गेलो. हॉकी महाराष्ट्राच्या या उपक्रमामुळे चाहत्यांना देखील त्यांच्या आदर्श खेळाडूंना जवळून पाहता आले.,’अशी प्रतिक्रिया माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू एडगर मस्करेन्हास याने व्यक्त केली. या वयातही धनराजच्या चपळपणात कुठेच कमतरता दिसून आली नाही. धनराजने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की,”माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. ज्या खेळाडूंबरोबर खेळलो त्या जुन्या खेळाडूंचा सहवास या निमित्ताने लाभला. मी स्वतःला खूप भाग्यवान मानतो की मला या वेळी देखील त्यांची साथ करता आली.’

ऑलिंपियन्स संघाकडून समीर दाड या एकमेव ऑलिंपियनने गोल केला. अजित शिंदेने सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधल्यानंतर युवराज वाल्मिकीने ऑलिंपियन्स संघाचा विजय साकार केला. यावेळी इमॅक्‍युअर फार्माचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिश मेहता यांच्या हस्ते ऑलिंपिक डे निमित्त केक कापण्यात आला. सामन्यात ऑलिंपियन्स खेळाडूंनी चाहत्यांबरोबर सेल्फीचाही आनंद घेतला. शाळकरी मुले या खेळाडूंबरोबर फोटो आणि त्यांची सही मिळाल्याचा आनंद बरोबर घेऊन जात होती.

या सोहळ्यास महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, हॉकी महाराष्ट्रचे उपाध्यक्ष मनिष आनंद, उपाध्यक्ष जसिंता जाधव, खझिनदार पराग ओझा, प्रायोजक कविता रतिश, खडकी कॅटेन्मेंट बोर्डाच्या सदस्या पूजा आनंद, हॉकी महाराष्ट्रचे सह सिचव फिरोज शेख, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे पीआरओ भगवान परदेशी, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे प्रमुख कपिल कोहली, हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे उपस्थित होते.

निकाल
ऑलिंपियन इलेव्हन 3 (गुरमित राव 21वे, समीर दाड 32वे, युवराज वाल्मिकी 58वे) वि.वि. महाराष्ट्र इलेव्हन 2 (अजित शिंदे 43, 52वे मिनिट)

ऑलिंपियन संघ – आकाश चिकटे (गोलरक्षक), महंमद रियाझ, राहुल सिंग, युवराज वाल्मिकी, धनराज पिल्ले (कर्णधार), समीर दाड, तुषार खांडेकर, रेणुका यादव, अजितेश रॉय, गिरीश पिंपळे, विक्रम पिल्ले, प्रिती दुबे, शांगाई पोनम्मा, अजित लाक्रा, सुरज केरकटा (गोलरक्षक), गुरमित राव, व्यवस्थापक – एडविन मोती

महाराष्ट्र इलेव्हन – अक्षता ढेकळे, इल्सन मुंडु, राहुल शिंदे, योगेश बोरकर, महंमद नियाज (कर्णधार), अजित शिंदे, राहुल तिर्की, राहुल संडेर, भूषण ढेरे, तालिब शाह, बसंत तिर्की, सेबॅस्टिअन दास, राहुल रसाळास वेंकटेश केंचे, हरिष शिंगडी, शिव रसाळ (गोलरक्षक), सरिता भिसे (गोलरक्षक), रुजुता पिसाळ, व्यवस्थापक ः सागर ठाकूर

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.