Pimpri News : औद्योगिकनगरीत रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय सुरू करा, काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुशल अकुशल कंत्राटी तसेच शिकवू कामगारांची गरज निर्माण होत असते. त्यासाठी औद्योगिकनगरीत रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहराध्यक्ष विशाल सरोदे व कार्याध्यक्षा सुप्रिया पोहरे यांनी कौशल्य विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त कविता जावळे यांच्याकडे केली आहे.

याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात असणारी एकंदरीत परिस्थिती स्वयंरोजगार व रोजगाराच्या बाबतीमध्ये युवकांच्या असणाऱ्या अडचणी व त्या सोडवण्यासाठी असणारी शासकीय यंत्रणा यांचा समन्वय साधण्यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे चालविण्यात येणारे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे कार्यालय पिंपरी येथे कार्यरत होते.  पण, ते गेल्या काही वर्षापासून बंद आहे. ते पुन्हा सुरू करावे किंवा नवीन जागेत ते सुरू करून या वाढत्या बेरोजगारीच्या काळात युवकांना दिलासा देणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुशल अकुशल कंत्राटी तसेच शिकवू कामगारांची गरज निर्माण होत असते.

रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयाच्या माध्यमातून रोजगार मेळावे स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जात असते. यामुळे युवावर्गाला मोठा दिलासा मिळून नोकऱ्या प्राप्त होत असतात तसेच बेरोजगार युवकांची नोंदणी व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात.

शहरतील वाढती लोकसंख्या, वाढती युवा लोकसंख्या व वाढती बेरोजगारी यांची समस्या लक्षात घेता युवकांना रोजगार क्षेत्रांमध्ये दिलासा देणारे व मोलाची भूमिका बजावणारे कौशल्य विकास विभागाचे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र कार्यालय त्वरित सुरू करावे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.