Chinchwad News : आकडेवारी सांगतेय की, सोमवारी पिंपरी-चिंचवड शहरात एकाही नागरिकाने प्रशासनाचे नियम मोडले नाहीत

लॉकडाऊनच्या काळातील 14 सप्टेंबर हा तिसरा असा दिवस आहे. ज्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात एकही कारवाई झाली नाही.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून देण्यात येणा-या आकडेवारी नुसार, सोमवारी (दि. 14) शहरातील एकावर देखील प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी सर्व पिंपरी-चिंचवडकरांनी नियमांचे पालन केले असून एकानेही नियम मोडले नसल्याचे दिसून येत आहे.

 

कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. अनेक प्रकारचे निर्बंध प्रशासनाकडून घालण्यात आले आहेत. कोरोनाच्या साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून ही खबरदारी घेतली जात आहे. याची अंमलबजावणी पोलिसांकडून केली जात आहे.

प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित नागरिकावर भारतीय दंड विधान कलम 188 नुसार कारवाई केली जात आहे. त्यानंतर नियम मोडणा-या नागरिकावर खटला भरून त्यात त्याला कारावास अथवा आर्थिक दंड केला जात आहे. दररोज पोलिसांकडून शेकडो लोकांवर ही कारवाई केली जात आहे.

यापूर्वी देखील दोन दिवस एकही कारवाई झालेली नव्हती. लॉकडाऊनच्या काळातील 14 सप्टेंबर हा तिसरा असा दिवस आहे. ज्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरात एकही कारवाई झाली नाही. कोरोना साथ सुरु होऊन सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या काळात प्रशासन प्रत्येक स्तरावरून काळजी घेण्याचे, नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र, नागरिक त्याला पायदळी तुडवून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. केवळ तीन दिवस सर्व नागरिकांनी नियमांचे पालन केले असल्याचे आकडेवारी सांगत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.