PCMC : पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रक्रिया तात्काळ राबवा

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आकुर्डी, पिंपरी आणि डुडूळगाव या ठिकाणी गृहप्रकल्प आहेत. यामधील तयार झालेल्या सदनिकांची सोडत प्रक्रिया तात्काळ राबवावी, अशी सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

Chakan Midc : अदानींच्या आशिर्वादाने निम्मे पुणे अंधारात – अजित गव्हाणे

याबाबत महापालिका (PCMC) आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पंधानमंत्री आवास योजनेंतर्गत आकुर्डी एचडीए आरक्षण क्र. २८३ व पिंपरी एचडीए आरक्षण क्रमांक ७७ येथील प्रकल्पांचे काम पूर्ण झालेले आहे.

या प्रकल्पाच्या माध्यमातून पिंपरी येथे ३७०, आकुर्डी येथे ५६८ सदनिका तयार आहेत. डुडूळगाव येथील प्रकल्पामध्ये १ हजार १९० सदनिका उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. एकूण २ हजार १२८ सदनिकांची सोडत प्रक्रिया राबबावी, अशी सूचना आहे.

सोडत प्रक्रिया आणि लाभार्थी निश्चित करण्याकामी संगणक प्रणाली विकसित करणे, लाभार्थींचे अर्ज मागवणे, यासह अन्य कामकाजाचे नियोजन करण्याबाबत संबंधित विभागाला तात्काळ सूचना कराव्यात. याबाबत सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील नागरिकांना हक्काचे घर उपलब्ध व्हावे. या करिता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘‘पंतप्रधान आवास योजना’’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. कामगार, कष्टकऱ्यांची नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये (PCMC) या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. याबाबत सकारात्मक भूमिकेतून प्रशासनाने कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत कार्यवाही होईल, अशी अपेक्षा आहे, असे आमदार लांडगे म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.