Strange Demand of Jat Panchayat :  बहिष्कृत कुटुंबाकडे दंड म्हणून दारू, बोकड आणि पैशाची मागणी

कुटुंबियांसह महिलेवर बहिष्कार

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील धनकवडी परिसरात  जात पंचायती समोर मालमत्तेचा न्यायनिवाडा न केल्यामुळे एका महिलेला तिच्या कुटुंबियासह समाजातून बहिष्कृत करण्यात आले. याशिवाय समाजात परत यायचे असल्यास पाच बोकड, पाच दारूच्या बाटल्या आणि एक लाख रुपये दंड देण्याचे फर्मान जातपंचायत सोडले. जर का याप्रकरणात कोर्टकचेरी केली तर समाजातून कायमचा बहिष्कार टाकण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो सासवड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला गृहिणी असून कुटूंबियासह धनकवडी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांची आईही धनकवडीत राहायला आहे. फिर्यादीच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यांपासून आरोपी सुरेश बिनावत त्यांच्या आईला फोन करून जातपंचायतीमध्ये मालमत्तेचा निवाडा करण्याचे सांगत होता.

मात्र, त्यांनी मालमत्तेच्या निवाड्याला विरोध केल्यामुळे सुरेशाला राग आल्यामुळे त्याने फिर्यादीच्या आईला फोनवर शिवीगाळ केली. त्यामुळे त्या चक्कर येउन पडल्या. त्यानंतर फिर्यादी यांनी स्वतःचा व्हाईस रेकॉर्ड करून जागेसंदर्भात आईला कोणीही त्रास न देण्याचा मेसेज त्यांच्या समाजाच्या ग्रुपवर व्हायरल केला. त्यामुळे सुरेशला राग आल्यामुळे त्याने जातपंचायतीची बैठक बोलावून फिर्यादीसह तिच्या बहिणींना माफी मागण्यास सांगितले.

जातपंचायतीच्या मिटींगमध्ये फिर्यादी आणि तिच्या कुटूंबियासह बहिणीला समाजातून एक वर्ष बहिष्कृत करण्याचा निर्णय घेतला. जर एक वर्षांच्या आतमध्ये जाती-समाजामध्ये परत यायचे असल्यास संबंधितानी पंचकमिटीली ५ दारूच्या बाटल्या, ५ बोकडे आणि १ लाख रूपये दंड म्हणून दयावा लागेल असे सांगितले.

तसेच वर्षाच्या आतमध्ये ते जातीमध्ये न आल्यास कायमस्वरूपी बहिष्कृत करण्याचा इशारा दिला. जो कोणी संबंधितांना मदत करेल, त्यांना जातीतून बहिष्कृत केले जाईल. त्यांना कोणीही कार्यक्रमाला बोलावू नका, असा व्हिडिओ काढून फिर्यादी यांच्या कुटूंबियाला पाठवित समाजातून बहिष्कृत केले आहे.

याप्रकरणी सासवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.