Talegaon Dabhade : वृत्तपत्रांमधील जाहिरातींच्या आक्रमणामुळे पत्रकारितेमधील निर्भीडपणा ओसरला

एमपीसी न्यूज- वृत्तपत्रावर उद्योजकाच्या जाहिरातीचे आक्रमण होत चालले असून त्यामुळे वृत्तपत्रांचा निर्भीडपणा कमी होत चालला असल्याची खंत माजी खासदार भारतकुमार राऊत यांनी व्यक्त केली. तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 208 व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात राऊत हे ‘पत्रकारिता काल व आज’ या विषयावर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, मुख्याधिकारी दीपक झिंजाड, तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

राऊत म्हणाले, ” बाळशास्त्री जांभेकरांनी जी पत्रकारीता केली ती आम्ही करतो का ? हा मोठा प्रश्न आहे. टिळक, आगरकर, आंबेडकर,आचार्य अत्रे आदींनी केलेली पत्रकारीता आणि आजच्या काळातील पत्रकारितेमध्ये खूप तफावत आहे. कालची पत्रकारिता उपजीविकेचे साधन म्हणून नव्हती किंवा अन्य मार्गाने पैसे मिळविण्यासाठी केली जात नव्हती. त्यावेळी पत्रकारितेकडे धर्म म्हणून पाहिले जायचे आता पत्रकारिता उद्योग झाला आहे. आज आम्ही फक्त व्यावसायिक म्हणून पत्रकारिता करत आहोत.

सध्याची पत्रकारिता ही गतिमान झाली असून वाचकांची संख्या देखील वाढली आहे. तसा वृत्तपत्र खर्च वाढत चालला आहे. त्यामुळे जाहिराती घेणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे वृत्तपत्रावर उद्योजकाच्या जाहिरातीचे आक्रमण होत चालले असून त्यामुळे वृत्तपत्रांचा निर्भीडपणा कमी होत चालला आहे अशी खंत राऊत यांनी व्यक्त केली. पत्रकारांनी नवनव्याची कास धरून पत्रकारिता केली पाहिजे. सध्या अनेक लोक वर्तमानपत्र वाचू लागली आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे विषय वर्तमानपत्रांनी दिले पाहिजे. सुजाण नागरिकांना माहिती पुरवणे आणि शिक्षण देणे या बरोबरच त्यांचे रंजन करणे हेही महत्वाचे झाले आहे.

यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनीही आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील कार्याची माहिती दिली.

यावेळी पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे,माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, माजी सभापती विठ्ठलराव शिंदे,जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश खांडगे,पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अशोक काळोखे, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, महिला भाजप अध्यक्ष अलका भास्कर, माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सुनीता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, यादवेंद्र खळदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, गटनेते अमोल शेटे, सुशील सैंदाणे,नगरसेवक अरूण भेगडे पाटील, अरूण माने, निखील भगत, रोहित लांघे, नगरसेविका शोभा भेगडे, मंगल जाधव, नीता काळोखे, हेमलता खळदे, मंगल भेगडे, संगीता शेळके, संध्या भेगडे, काजल गटे, कल्पना भोपळे, अनिता पवार, माजी नगराध्यक्षा माया भेगडे, नंदकुमार शेलार, वडगाव ग्रामीण पञकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा, गणेश विनोदे, तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश बोरूडे, विलास भेगडे, जगन्नाथ काळे, हभप नंदकुमार भसे, आजी- माजी नगरसेवक आदि मान्यवर व नागरिक उपस्थित होते.

स्वागत मनोहर दाभाडे यांनी केले तर प्रास्ताविक सुरेश साखवळकर यांनी केले. सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले. आभार सोनबा गोपाळे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.